गोवा खबर

विकसित भारताचे भविष्य आजच्या तरुणांच्या हाती : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Published

on

Spread the love

गोवा खबर : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये आजच्या युवा पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, उद्याचा विकसित भारत आजचे तरुणच घडवतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat), उत्तर गोवा यांच्या वतीने आयोजित ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत – युवा संवाद’ कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत व्यसनमुक्त समाजनिर्मिती, युवा सक्षमीकरण आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उपस्थितांना ‘नशामुक्त भारत’ची शपथ दिली. अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी, जबाबदार आणि सक्षम युवा पिढी घडवण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जबाबदार नागरिकत्व, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवा पिढीची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘मेरा युवा भारत’च्या कार्यकर्त्यांना गोव्यातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत ‘नशामुक्त भारत’चा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी युवकांचा सहभाग वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या उभारणीबाबत जनजागृती करण्यात आली.

Trending

Exit mobile version