गोवा खबर: दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्रांच्या माजी मानवाधिकार उच्चायुक्त नवनेथम (नवी) पिल्लई यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाले आहे.
शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी पिल्लई यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारांचे संरक्षण, न्यायव्यवस्था आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराची घोषणा केली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संस्थांना बळकट करण्यासाठी पिल्लई यांनी दिलेल्या योगदानाची समितीने दखल घेतली आहे.
भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्यांनी वर्णभेदविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी काम केले. १९९५ मध्ये त्या दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या.
नोबेल शांतता पुरस्काराचे औपचारिक वितरण १० डिसेंबर रोजी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे होणार आहे. पुरस्कारासोबत १ कोटी २० लाख स्वीडिश क्रोनरची रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.