‘विद्याप्रबोधिनीसाठी एका चित्रपटाचे संपूर्ण मानधन देण्याची नानांनी दर्शवली होती तयारी’; घरी अचानक येऊन दीड तास मारलेल्या गप्पांची आठवण
गोवा खबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी संघप्रमुख सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ‘नाना गेला? असा कसा जाईल?’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाना पाटेकर यांच्यासोबत झालेल्या भेटी, त्यांचा दिलखुलास स्वभाव आणि सामाजिक कार्यासाठी मदत करण्याची तयारी याबाबत वेलिंगकर यांनी अनेक आठवणी सांगितल्या.
वेलिंगकर यांनी सांगितले की, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भंडारी समाजातर्फे कला अकादमीत आयोजित सत्कार सोहळ्यात नाना पाटेकर यांची त्यांच्याशी पहिली प्रत्यक्ष भेट झाली होती. या कार्यक्रमाला नाना प्रमुख पाहुणे होते, तर वेलिंगकर प्रमुख वक्ते होते.
त्या कार्यक्रमातील वेलिंगकर यांचे भाषण नानांना खूप आवडले होते. त्यानंतर नानांनी सलील सावकार यांच्याकडे सुभाष वेलिंगकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सलील सावकार हे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री प्रसाद सावकार यांचे धाकटे पुत्र आहेत.
‘कोणतीही पूर्वकल्पना न देता नाना आमच्या घरी आले. जणू अनेक वर्षांची ओळख असल्याप्रमाणे त्यांनी घरातील सर्वांशी दीड तास दिलखुलास गप्पा मारल्या. चहा घेतला आणि आमच्यासाठी एक अविस्मरणीय आठवण ठेवून गेले,’ असे वेलिंगकर यांनी सांगितले.
यानंतर नाना पाटेकर यांच्याशी दुसरी भेट सावकार कुटुंबीयांच्या घरी झाली. या भेटीत वेलिंगकर यांनी विद्याप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्याची माहिती नानांना दिली. त्यावेळी संस्थेच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते.
विद्याप्रबोधिनीच्या कार्यासाठी आर्थिक मदत करण्याची तयारी नानांनी तत्काळ दर्शवली होती. वर्षातून तीन चित्रपटांत भूमिका करत असल्याने पुढील वर्षी त्यापैकी एका चित्रपटातून मिळणारे संपूर्ण मानधन विद्याप्रबोधिनीला देण्याचे आश्वासन नानांनी दिले होते, अशी महत्त्वपूर्ण आठवण वेलिंगकर यांनी सांगितली.
मात्र, गोव्यातील काही परिस्थितीजन्य कारणांमुळे या आश्वासनाचा पुढे पाठपुरावा करता आला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
नाना पाटेकर यांच्या ‘प्रहार’ या गाजलेल्या चित्रपटाचाही वेलिंगकर यांनी विशेष उल्लेख केला. विद्याप्रबोधिनीच्या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांना हा चित्रपट आवर्जून दाखवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून तरुण पिढीला देशकार्यासाठी प्रेरित करण्याची कल्पनाही वेलिंगकर यांनी नानांसमोर मांडली होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी वर्षातून दोन-तीन वेळा गोव्यात येण्याची विनंती त्यांनी नानांना केली होती. नानांनी ही विनंती मान्य केली होती.
मात्र, त्यानंतर भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाची प्रमुख जबाबदारी आपल्यावर आल्यामुळे या उपक्रमाचाही पाठपुरावा करता आला नाही. दरम्यान, नानांनी दोन-तीन वेळा दूरध्वनीवरून विचारपूस केली होती, असे वेलिंगकर यांनी सांगितले.
नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या शेवटच्या प्रत्यक्ष भेटीची आठवण सांगताना वेलिंगकर म्हणाले की, सलील सावकार यांच्या मुलीच्या लग्नात नानांची भेट झाली होती. त्यावेळी नानांनी हसतमुखाने स्वागत केले आणि आपल्या मुलाला बोलावून वेलिंगकर यांचा परिचय करून दिला. तीच त्यांची शेवटची प्रत्यक्ष भेट ठरली.
२०१२ नंतर पर्रीकर सरकारच्या भूमिकेमुळे संपर्क तुटला
वेलिंगकर यांनी नाना पाटेकर यांच्याशी संपर्क तुटण्यामागील राजकीय मतभेदांचाही उल्लेख केला. २०१२ मध्ये मनोहर पर्रीकर सरकार सत्तेवर आल्यानंतर मातृभाषेतील शिक्षणाचे माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याच्या प्रश्नावरून भारतीय भाषा सुरक्षा मंचने सरकारविरोधात पुन्हा आंदोलन सुरू केले होते.
नाना पाटेकर हे मनोहर पर्रीकर यांचे निष्ठावंत समर्थक होते आणि त्यांनी पर्रीकरांची बाजू घेतली. त्यामुळे त्यानंतर नानांशी संपर्क तुटला आणि पुन्हा भेट झाली नाही, असे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.
‘नाना सगळ्यांशी एकवचनी बोलणारा, मैत्रीचे वेगळेच रूप जपणारा माणूस होता. आज त्याच्या आकस्मिक निधनानंतर मनात साठवून ठेवलेल्या आठवणींचा बांध फुटला,’ अशा भावनिक शब्दांत वेलिंगकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘नानांच्या स्मृतीला साश्रू श्रद्धांजली! या थोर नटसम्राटाच्या आत्म्याला सद्गती लाभो,’ अशा शब्दांत सुभाष वेलिंगकर यांनी नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप दिला.