ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडून तीव्र शोक व्यक्त
गोवा खबर:प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. “नाना म्हणजे केवळ एक नाव नसून अभिनयाचे एक वादळ होते,” अशा शब्दांत नाईक यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देताना दामू नाईक म्हणाले की, आपल्या कसदार आणि सहज अभिनयाने मोठ्या-मोठ्या कलाकारांवर छाप पाडणारा तो एक ‘बाप माणूस’ होता. अभिनयासोबतच त्यांचा स्वभाव परखड, स्पष्टवक्ता आणि तोंडावर बोलणारा असला, तरी ते मनाने तितकेच दिलदार आणि सुंदर व्यक्ती होते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीने ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजूंसाठी उभारलेल्या समाजकार्याला तोड नाही, असा गौरवही त्यांनी केला.
गोव्याशी आणि गोवेकरांशी घट्ट नाते
नाना पाटेकर यांचे गोव्यावर आणि इथल्या मातीवर विशेष प्रेम होते. “कोकणीत ‘कसो आसा रे’ अशी आपुलकीने विचारपूस करणारा आणि खळखळून हसणारा हा माणूस अक्षरशः गोवेकरच झाला होता,” अशी भावना नाईक यांनी व्यक्त केली. तसेच, पुण्यात आनंद माशेलकर यांच्या माध्यमातून आपली नानांशी पहिली भेट झाली होती आणि तेव्हापासून आजतागायत त्यांची घट्ट मैत्री टिकून राहिली, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
‘अंकुश’, ‘परिंदा’, ‘तिरंगा’ यांसारखे चित्रपट असोत किंवा नाट्यक्षेत्रातील अजरामर काम, नानांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले. सिनेमा आणि नाटक क्षेत्रातील ते एक चालते-बोलते ग्रंथालय व प्रयोगशाळा होते.
आज आपण एका महान अभिनेत्याला आणि मी एका जवळच्या मित्राला मुकलो आहोत, असे सांगत या मोठ्या रंगमंचावरून स्वर्गाच्या रंगमंचाकडे प्रयाण करणाऱ्या या अवलियाच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना हे दुःख पचवण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना दामू नाईक यांनी केली.