गोवा खबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना आज पहाटे सुमारे ४.२० वाजता मृतावस्थेत मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर (CPR) देऊन प्रयत्न केले. मात्र, त्यांना वाचवण्यात यश आले नाही. सकाळी ५.२० वाजता त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी माध्यमांना दिली.
पहाटे अडीच वाजता मित्राला पाठवला संदेश
डॉ. साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी पहाटे सुमारे २.३० वाजता आपल्या एका मित्राला संदेश पाठवला होता. आपली प्रकृती ठीक नसून शरीराच्या डाव्या बाजूला वेदना होत असल्याचे त्यांनी या संदेशात नमूद केले होते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्यांच्या मित्राला हा संदेश वेळेवर पाहता आला नाही.
सकाळी सुमारे ४ वाजता संबंधित मित्र नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी नाना यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांना मोठ्या प्रमाणात घाम येत होता.
घरातूनच सीपीआर देण्यास सुरुवात
नाना पाटेकर यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या केअरटेकरने रुग्णालयातून रुग्णवाहिका आणली. मात्र, रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत नाना पूर्णपणे बेशुद्ध झाले होते.
त्यानंतर घरातूनच त्यांना सीपीआर देण्यास सुरुवात करण्यात आली. सीपीआर सुरू ठेवत त्यांना मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत हलवला
नाना पाटेकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने नियमानुसार मेडिको-लीगल केस (MLC) नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांच्या उपस्थितीत त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (गोमेकॉ) हलवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले.
पूर्वीच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती नाही
नाना पाटेकर यांच्यावर यापूर्वी मणिपाल रुग्णालयात रुग्ण म्हणून उपचार झालेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती रुग्णालयाकडे उपलब्ध नसल्याचे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले.
या घटनेची माहिती नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.