गोवा खबर

“गोयंचो सायब, संत फ्रान्सिस झेवियर यांच्यावर टीका करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले” : गिरीश चोडणकर

Published

on

Spread the love

“गोव्यात भाजपला काँग्रेस हाच एकमेव पर्याय; मतविभाजन करणाऱ्यांपासून सावध राहा” – युरी आलेमाव

गोवा खबर : गोमंतकीयांनी धर्म आणि जात न पाहता नेहमीच एकोपा व सामाजिक सलोखा जपला आहे. मात्र, राजकीय स्वार्थ आणि मतविभाजनाच्या माध्यमातून निवडणुकीचा फायदा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपकडून गोव्यातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. ‘गोंय राखण यात्रे’च्या बाणावली येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत जबाबदार असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.

ते म्हणाले, “गोव्याबाहेरील व्यक्तींना बोलावून आपल्या परंपरा आणि गोयंचो सायब, संत फ्रान्सिस झेवियर यांच्यावर टीका करण्यासाठी मुख्यमंत्री व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. गोवा नेहमीच धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्यासाठी ओळखला जातो. हा सामाजिक सलोखा कोणीही बिघडवू देणार नाही.”

भाजप सरकार जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर उत्तर देण्यास अपयशी ठरल्यामुळे जनतेचे लक्ष बेरोजगारी, वाढती महागाई, ढासळलेले प्रशासन आणि गोव्याच्या साधनसंपत्तीच्या कथित लुटीकडून वळविण्यासाठी फूट पाडण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला.

भाजपविरोधी आणि काँग्रेसविरोधी सरकारचा पर्याय देण्याचा दावा करणाऱ्या काही राजकीय पक्षांवर टीका करताना चोडणकर म्हणाले की, त्यामागील वास्तव वेगळे आहे.

“आमची लढाई भाजपविरोधात आहे. भाजप आमच्याशी थेट लढत नाही, तर इतरांचा वापर करतो. आम्ही भाजपवर टीका केली की भाजपचे छुपे मित्र काँग्रेसवर टीका करतात. काही जण पैशांच्या जोरावर राजकारण करीत आहेत. भाजपचे मुख्यमंत्री पैसा आणि सत्तेच्या यंत्रणेचा वापर करून मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे. केवळ दोन-चार टक्के मतांसाठी समाजात आणि मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा,” असे आवाहन त्यांनी केले.

भाजपविरोधी मतांची विभागणी करून भाजपला लाभ मिळवून देऊ पाहणाऱ्या शक्तींना जनतेने नाकारावे आणि राजकीय फूट पाडण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडावेत, असे आवाहन चोडणकर यांनी केले.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, काँग्रेसचे नेते हे केवळ निमित्तमात्र असून ‘गोंय राखण यात्रा’ ही प्रत्यक्षात गोव्याच्या जनतेचा आवाज आहे.

“आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत; प्रत्यक्षात ही यात्रा गोव्याचा आवाज आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बाणावलीकरांनी गोव्याचे अस्तित्व आणि अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी जनमत घडविण्याचे काम केले,” असे आलेमाव म्हणाले.

भाजपकडून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असून इतर राजकीय पक्षही त्याच दिशेने प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून आलेमाव यांनी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले.

“आज गोव्याचा मुख्यमंत्री सत्तेत आहे. त्यांनी गोवा विकण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या युवकांसाठी पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. टॅक्सीचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोवा माईल्स, ओला आणि उबर यांच्या माध्यमातून त्यांची लूट सुरू आहे. आपल्या मतदारसंघात केवळ दिनदर्शिकेवरील कार्यक्रमाप्रमाणे सरकारी कार्यक्रम घेतले जात आहेत; मात्र गोव्याची उदारमतवादी आणि सर्वसमावेशक ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

सरकारी कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये होत असल्याच्या कथित कमिशनच्या व्यवहारांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

“आपली खरी ताकद आपल्या एकजुटीत आहे. आपला लढा कोणत्याही धर्माविरुद्ध किंवा समाजाविरुद्ध नाही. हा लढा प्रत्येक गोमंतकीयासाठी आणि गोव्याच्या भविष्यासाठी आहे. गोव्याचे रक्षण करणे ही प्रत्येक गोमंतकीयाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आलेमाव म्हणाले.

“हा गोव्यासाठीचा लढा आहे. हा आपल्या मुलांच्या भविष्यासाठीचा लढा आहे. हा आपल्या जमिनीचा, आपल्या अस्मितेचा आणि आपल्या भविष्याचा लढा आहे. आपण सर्वांनी एकजूट राहिले पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या ‘गोंय राखण यात्रे’चा आज पंधरावा दिवस असून, दक्षिण गोव्यातील बाणावली विधानसभा मतदारसंघात यात्रेचे आगमन झाले.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष अल्टोन डिसोझा, एम. के. शेख, सुनील कवठणकर, उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, विठोबा देसाई, माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, समाजमाध्यम विभागाचे अध्यक्ष हिमांशू तिवरेकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक, सेवादल प्रमुख राजन घाटे, महिला निरीक्षक नुसरत अली, जिल्हाध्यक्ष असिझ नोरोंहा व मंगलदास नाईक, गटाध्यक्ष कीथ ग्रेशियस व एडविन बॅरेटो, वॉरेन आलेमाव, जिल्हा पंचायत सदस्या लुईझा रॉड्रिग्स, पॉल लोबो, संताना परेरा, सोलॉन फुर्ताडो, जेसन आंद्राडे, साविओ डिसिल्वा, पक्षाचे प्रवक्ते अमित पालेकर, प्रा. प्रभाकर तिंबले, साविओ कुतिन्हो, सपंच, पंच, आदी उपस्थित होते.

केपेचे आमदार अल्टोन डिसोझा यांनी कोणाचेही नाव न घेता ‘गोवा फर्स्ट’च्या नावाखाली एकत्र आलेल्या नेत्यांवर टीका केली.

“आज ऐनवेळी मतविभाजनाच्या उद्देशाने काही नेते ‘गोवा फर्स्ट’च्या नावाखाली एकत्र आले आहेत. मात्र कोणत्याही घोषणेच्या पुढे गोवा सर्वप्रथम असला पाहिजे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कोणीही कसलीही आश्वासने देऊ देत, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. एकमुखाने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा,” असे आवाहन डिसोझा यांनी केले.

युवा नेते वॉरेन आलेमाव आणि संतान परेरा यांनी स्थानिक प्रश्नांवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली आणि मतदारसंघातील जनतेच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले.

आम आदमी पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सेलेना यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी प्रभाकर तिंबले म्हणाले, “गोवा विकला जात असल्याचे आपण म्हणतो; मात्र आज भाजप देश विकत आहे. हा देश अदानी आणि अंबानी यांच्या ताब्यात देण्याचे काम सुरू आहे. आम आदमी पक्ष इतरांवर टीका करतो; मात्र प्रत्यक्षात भाजपविरोधात लढण्याऐवजी काँग्रेसचा पराभव करण्याचे काम करीत आहे.”

फिडोल परेरा यांनी काँग्रेस ही सध्या गोव्यातील विरोधकांच्या जहाजाची ‘कप्तान’ असल्याचे सांगत विरोधकांच्या ऐक्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

“विरोधक एकत्र आले तर भाजपला सत्तेतून घरी पाठवायला वेळ लागणार नाही,” असे ते म्हणाले.

टॅक्सीचालक संघटनेचे प्रतिनिधी अलेरिओ फर्नांडिस यांनी टॅक्सीचालकांना भेडसावणाऱ्या व्यावसायिक अडचणी मांडत सरकारच्या धोरणांवर टीका केली.

सकाळी काँग्रेसच्या गट कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावून जनजागृतीपर उपक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर केळशी, कर्मोणा फिश मार्केट, ओडली अव्हेन्यू, सुरावली आणि कोलवा येथे जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले.

दुपारच्या सत्रात डांडो मैदान येथून पदयात्रेला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून पदयात्रा मार्गक्रमण करीत सायंकाळी वार्का क्रीडा मंडळ येथे तिची सांगता झाली. यावेळी उपस्थितांना काँग्रेसच्या हाताच्या पंजाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर वार्का क्रीडा मंडळ येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एरिशा कोलाको यांच्या कोंकणी गीतांनी, एलिओशा पथकाच्या खारवी नृत्याने, रिस्बान ग्रेशियस यांच्या सादरीकरणाने आणि कोठी फुगडीने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी स्थानिक नेते सोलॉन फुर्ताडो, जिल्हा पंचायत सदस्या लुईझा रॉड्रिग्स आणि संतान परेरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जेसन आंद्राडे यांनी आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले.

Trending

Exit mobile version