गोवा खबर:संघटित सोने तस्करांवर सातत्याने सुरू असलेल्या धडक कारवाईचा भाग म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) देशभर पसरलेल्या सोने तस्करीचे जाळे उध्वस्त केले आहे. या कारवाईदरम्यान सुमारे 10.36 कोटी रुपये मूल्याचे 6.61 किलो परदेशी बनावटीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
हे रॅकेट कूरियर जाळ्याचा वापर करून चालवले जात होते. गेल्या नऊ महिन्यांत या माध्यमांद्वारे 475 कोटी रुपये मूल्याच्या तब्बल 318 किलो तस्करी केलेल्या सोन्याची वाहतूक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधारांपैकी एकासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
भारत-बांगलादेश सीमेवरून पश्चिम बंगाल आणि आसाममार्गे परदेशी बनावटीच्या सोन्याची नियमित तस्करी करून ते कूरियर पार्सलद्वारे देशाच्या विविध भागांत पाठवले जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्याआधारे 23 आणि 24 सप्टेंबर 2026 रोजी डीआरआयने विविध शहरांमध्ये एकाच वेळी समन्वयित कारवाई केली. मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि गुवाहाटी येथे एकाच वेळी झाडाझडती घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान गुवाहाटी आणि कोलकाता येथून मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथे वितरणासाठी पाठवण्यात आलेली सोन्याची कूरियर पार्सल्स जप्त करण्यात आली. ही पार्सल्स प्राप्त करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेण्यात आले, तर कोलकाता येथील पार्सल पाठवणाऱ्यांच्या/शिपरच्या ठिकाणांवर एकाच वेळी मारलेल्या छाप्यांमध्ये आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर जलद गतीने केलेल्या पुढील कारवाईत, या तस्करीच्या सोने पाठवणे आणि त्याचे वितरण सांभाळणाऱ्या मुख्य सूत्रधारांपैकी एकाला मुंबईत पकडण्यात आले.
हे रॅकेट गुवाहाटी आणि कोलकाता येथून मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादमधील वेगवेगळ्या जणांना स्थानिक बाजारात विक्रीसाठी सोने पाठवताना त्याचे छोटे-छोटे कूरियर पार्सल्स बनवत होते, असे तपासादरम्यान समोर आले. पार्सल पाठवणारे / पाठवण्याची व्यवस्था करणारे आणि ते मिळवणारे हे केवळ कागदावरच अस्तित्वात असलेले लोक व संस्था असल्याचे आढळले, ज्यांचा सोन्याचा कोणताही कायदेशीर व्यवसाय नव्हता. यावरून तस्करीचे सोने लपवण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी कूरियर नेटवर्कचा जाणीवपूर्वक वापर केला गेल्याचे स्पष्ट होते.
हस्तगत केलेल्या पार्सल्समधून सुमारे 10.36 कोटी रुपये मूल्याच्या 6.61 किलो वजनाच्या परदेशी बनावटीच्या सोन्याच्या लगडी जप्त करण्यात आल्या असून, सीमाशुल्क कायदा, 1962 च्या संबंधित कलमांनुसार ही जप्ती करण्यात आली आहे. या रॅकेटशी संबंधित एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कागदोपत्री पुराव्यांच्या प्राथमिक छाननीतून या रॅकेटच्या कारभाराचा अवाढव्य विस्तार उघडकीस आला आहे. या वर्षात आतापर्यंत, याच कूरियर जाळ्याचा वापर करून सुमारे 475 कोटी रुपये मूल्याच्या तब्बल 318 किलो सोन्याची वाहतूक व वितरण आधीच झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.