सांखळीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याकडून यात्रेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न; सरकारपुरस्कृत दादागिरीचा काँग्रेसचा आरोप
गोवा खबर: गोव्याची भूमी, अस्मिता, संस्कृती आणि भविष्यासाठी काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या ‘गोंय राखण यात्रेला’ मिळत असलेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून, आता यात्रा रोखण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी रडीचे डाव व सरकारपुरस्कृत दादागिरी सुरू झाली आहे, असा घणाघाती आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.
सांखळी मतदारसंघातून ‘गोंय राखण यात्रा’ मार्गक्रमण करीत असताना भाजप युवा मोर्चाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने यात्रेच्या ठिकाणी जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले की, संबंधित व्यक्ती महिला यात्रेकरूंचे चित्रीकरण करीत होती आणि त्यांना “तुम्ही कुठून आला आहात?”, “तुम्हाला कोणी पैसे दिले?” अशा उद्देशपूर्ण प्रश्नांनी डिवचण्याचा प्रयत्न करीत होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याची ओळख विचारण्यात आली. संबंधित व्यक्तीने स्वतःला स्वतंत्र डिजिटल इन्फ्लुएन्सर असल्याचे सांगितले; मात्र काँग्रेसच्या म्हणण्यानुसार त्याचे ओळखपत्र तपासल्यानंतर तो भाजप युवा मोर्चाच्या सांखळी युनिटशी संबंधित सक्रिय कार्यकर्ता असल्याचे समोर आले.
“स्वतंत्र डिजिटल इन्फ्लुएन्सरच्या नावाखाली भाजपचा कार्यकर्ता यात्रेत का पाठवला? महिला यात्रेकरूंचे चित्रीकरण करून त्यांना जाब विचारण्याचा अधिकार त्याला कोणी दिला?” असा सवाल पणजीकर यांनी उपस्थित केला.
वाद निर्माण झाल्यानंतरही संबंधित भाजप पदाधिकाऱ्याने घटनास्थळावरून जाण्यास नकार दिला. उलट, काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद वाढवून वातावरण चिघळविण्याच्या उद्देशाने त्याने इतरांना घटनास्थळी बोलावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
*‘यात्रेला जनतेचा प्रतिसाद, म्हणून भाजपच्या पोटात गोळा’*
“आधी भाडोत्री माध्यमांच्या माध्यमातून ‘गोंय राखण यात्रेला’ बदनाम करण्याचा प्रयत्न झाला; आता यात्रेच्या मार्गावर कार्यकर्ते पाठवून गोंधळ घालण्याचा उद्योग सुरू झाला आहे. मात्र भाजपने कितीही षडयंत्रे केली, कितीही दादागिरी केली, तरी गोव्याच्या जनतेचा आवाज दाबता येणार नाही,” असे पणजीकर यांनी ठणकावून सांगितले.
ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधकांच्या कार्यक्रमांना प्रश्न विचारण्याचा आणि राजकीय मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; परंतु महिला यात्रेकरूंचे चित्रीकरण करणे, त्यांना जाब विचारणे आणि जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा लोकशाही संवादाचा मार्ग नाही.
“मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच विरोधी पक्षाच्या यात्रेला अशा प्रकारे अडथळे निर्माण करण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर का आली? जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे?” असा सवाल पणजीकर यांनी केला.
*‘दादागिरीने गोव्याचा आवाज बंद होणार नाही’*
पणजीकर म्हणाले की, ‘गोंय राखण यात्रा’ ही केवळ काँग्रेसची राजकीय यात्रा नसून गोव्याची जमीन, ओळख, पर्यावरण, रोजगार, कायदा-सुव्यवस्था आणि भावी पिढ्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न जनतेसमोर मांडणारा जनसंपर्क उपक्रम आहे.
“गोव्याच्या जनतेसमोर सरकारच्या कामाचा हिशेब मागितला जात आहे. जमिनीचे प्रश्न, ३९ए, रोजगार, वाढती महागाई, अमली पदार्थांचा प्रश्न आणि गोव्याच्या अस्मितेचे रक्षण यावर सरकारने उत्तर द्यावे. त्याऐवजी यात्रा रोखण्यासाठी दादागिरी करणे म्हणजे सरकारकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, असेच सिद्ध होते,” असे पणजीकर म्हणाले.
सांखळीतील यात्रेदरम्यान झालेल्या कथित अडथळ्यांबाबत काँग्रेसने यापूर्वीही पोस्टर्स फाडणे आणि कार्यक्रमात अडथळे आणल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला असून ‘संघाच्या शिस्तीचा दावा करणाऱ्यांनी दादागिरीची संस्कृती निर्माण करू नये’ “दिवसभर विकासाच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे विरोधकांच्या लोकशाही कार्यक्रमात गोंधळ घालण्यासाठी कार्यकर्ते पाठवायचे, ही कोणती लोकशाही? मुख्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात विरोधकांचा आवाज ऐकण्यास तयार नसतील, तर संपूर्ण गोव्याच्या जनतेचे प्रश्न ते कसे ऐकणार?” असा सवाल पणजीकर यांनी केला.
“भाजपला वाटत असेल की दहशत, दबाव आणि दादागिरीच्या जोरावर ‘गोंय राखण यात्रा’ थांबवता येईल, तर तो त्यांचा मोठा गैरसमज आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत आणि गोव्याच्या जनतेचा आवाजही दाबला जाणार नाही.”
पणजीकर यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा चिथावणीला बळी पडणार नाही; मात्र लोकशाही मार्गाने गोव्याच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
“आमी तुमकां भिवचें ना!
तुमची दादागिरी चलची ना!!
असे अमरनाथ पणजीकर यांनी ठणकावून सांगितले