गोवा खबर:स्वच्छता, स्वदेशी आणि स्वावलंबन ही गांधीजींची आदर्श तत्वे राष्ट्राच्या वाटचालीस मार्गदर्शन करीत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सांगितले. मुख्यमंत्री आज जूने गोव्यातील गांधी चौकात १५७ व्या गांधी जयंतीच्या राज्यस्तरीय सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमात माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीही साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या आदर्शांचे आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचे चिरस्थायी महत्त्व प्रतिपादन करण्यात आले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले “महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा आणि स्वदेशी हे आदर्श, तसेच स्वच्छता, ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण आणि आत्मनिर्भरता यांसंबंधीची त्यांची दूरदृष्टी देशाला सतत मार्गदर्शन करत आहे.” ते म्हणाले की, याच मूल्यांनुसार आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी प्रयत्न पुढे नेले जात आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आणि विविध स्वच्छता उपक्रमांवरही प्रकाश टाकला.
डॉ. सावंत यांनी गोवा सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने अमली पदार्थ आणि क्षयरोगमुक्त भारत घडवण्यासाठी कार्यरत आहे असे सांगितले आणि या प्रयत्नांच्या यशासाठी समाजातील सर्व स्तरांचा सामूहिक सहभाग आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी दहशतवाद आणि नक्षलवादाविरुद्धच्या देशाच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. विकासाबाबत बोलताना त्यांनी युवाशक्ती, नारीशक्ती, किसानशक्ती आणि गरीब कल्याण हे चार आधारस्तंभ राष्ट्राला आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रगतीसाठी मार्गदर्शन करत आहेत असेही सांगितले. त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांनाही आदरांजली वाहिली आणि त्यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या संदेशाचे महत्त्व प्रतिपादन केले.
समर्पित सेवा आणि जनहितार्थ कार्याचा गौरव करत जुने गोवा अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये उप-अधिकारी रोहिदास डी. परब आणि पांडुरंग एस. कंकणकर, तसेच लीडिंग फायर फायटर्स अमित व्ही. रिवणकर, विनायक व्ही. नाईक आणि उगम व्ही. शेट गोवेकर यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला ऊर्जा आणि नवीन व नवीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक, कुंभारजुवाचे आमदार श्री राजेश फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य श्री सिद्धेश नाईक, ओल्ड गोव्याच्या सरपंच श्रीमती मेधा एम. परवतकर, मुख्य सचिव, आयएएस डॉ. व्ही. कंदवेलू, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.