गोवा खबर

गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय : सचिन पायलट

Published

on

Spread the love

साखळीतील ‘गोंय राखण यात्रे’त भाजपवर जोरदार हल्लाबोल; “सत्ता परिवर्तनाची सुरुवात साखळीतून करा”

गोवा खबर: देशात “अब की बार चारसौ पार”चा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत केवळ २४० जागांवर समाधान मानावे लागले. केंद्रात सरकार स्थापन करताना मित्रपक्षांच्या मदतीची गरज भासली. त्यानंतरही सत्तेच्या असुरक्षिततेतून तृणमूल काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण करण्यात आले. भाजपचे ‘फोडा आणि राज्य करा’चे राजकारण देशाने पाहिले आहे. ‘डबल इंजिन सरकार’चा दावा केला जात असला, तरी विकासाच्या बाबतीत हे इंजिन केवळ धूर सोडताना दिसत आहे. सत्तेच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीची मूलभूत ओळख कमकुवत करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे गोव्यात सत्ताधाऱ्यांसमोर काँग्रेस हाच जनतेसमोरील पर्याय आहे, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला.

काँग्रेसच्या ‘गोंय राखण यात्रे’ने गांधी जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात प्रवेश केला. या यात्रेचे नेतृत्व सचिन पायलट यांनी केले. यावेळी त्यांनी मतदार यादीतील नावांशी संबंधित प्रश्नांपासून गोव्याची जमीन, पर्यावरण, रोजगार, वारसा आणि प्रशासनाच्या प्रश्नांपर्यंत विविध मुद्द्यांवर भाजप सरकारवर टीका केली.

मतदार याद्यांमधील नावांच्या प्रश्नावर बोलताना सचिन पायलट यांनी भाजपवर निशाणा साधत, “भाजपने आधी नोटबंदी केली आणि आता मतबंदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,” असा आरोप केला. ज्या भागात भाजपला निवडणुकीच्या दृष्टीने अडचणीची शक्यता वाटते, त्या भागात मतदारांशी संबंधित प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारांच्या हक्कांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘गोंय राखण यात्रा’ ही केवळ राजकीय यात्रा नसून गोव्याची जमीन, पर्यावरण, रोजगार, सांस्कृतिक ओळख, वारसा आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्न जनतेसमोर मांडण्याचे आंदोलन आहे, असे पायलट यांनी सांगितले.

गांधी जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख करताना पायलट यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचे कौतुक केले.

“गोंय राखण यात्रा होऊ नये यासाठी परवानगीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यात आले, पोस्टर्स फाडण्यात आले आणि लोकांना यात्रेत सहभागी होण्यापासून रोखण्याचे प्रयत्न झाले. मात्र, अशा दबावाला काँग्रेस कार्यकर्ते घाबरणार नाहीत. उलट ही परिस्थिती काँग्रेसला जनतेच्या प्रश्नांसाठी आणखी जोमाने लढण्याची प्रेरणा देणारी आहे,” असे पायलट म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवडणुकीतील मताधिक्याचा संदर्भ देत पायलट यांनी गोमंतकीयांना आवाहन केले की, “गोव्यातील सत्तापरिवर्तनाची सुरुवात साखळीतून करा.”

यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, वरुण चौधरी, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार अल्टन डिकॉस्टा, आमदार कार्लोस अल्वारेस फरेरा, एम. के. शेख, सुनील कवठणकर, अमरनाथ पणजीकर, हिमांशू तिवरेकर, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिक्षा खलप, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, सेवादल मुख्य संघटक राजन घाटे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक नेत्यांमध्ये मंगलदास नाईक, सूर्यकांत गावडे, धर्मेश सगलानी, प्रविण ब्लागन, प्रताप गावस, सुनीता वेरेकर, खेमलो सावंत, जयेश आमोणकर, गौरी गावस, ज्योत्स्ना गावस, रशीद खान चौधरी, रियाज गनी आदींचा समावेश होता.

यात्रेच्या सांगता सत्रात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्याच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. गोव्याची जमीन, अस्मिता, पर्यावरण, रोजगार आणि सांस्कृतिक वारसा यांचे संरक्षण करण्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करणे हा ‘गोंय राखण यात्रे’चा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेचे सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले. गटाध्यक्ष सूर्यकांत गावडे यांनी स्वागत केले, तर मंगलदास नाईक यांनी आभार मानले.

साखळीतील या सभेत काँग्रेसच्या स्थानिक तसेच वरिष्ठ नेत्यांनी गोव्याच्या स्थानिक प्रश्नांवर आणि राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ‘गोंय राखण यात्रा’ला साखळीत मिळालेला प्रतिसाद हा गोव्याच्या प्रश्नांवर जनतेमध्ये वाढत असलेल्या चर्चेचे द्योतक असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.चपय ह्या लोकनृत्यांने व सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली.

Trending

Exit mobile version