गोवा खबर

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान गोव्यातील सेवा संकल्प अभियानात झाले सहभागी

Published

on

Spread the love

राज्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी ‘विकास, संधी आणि आकांक्षा’ असल्याचे केले प्रतिपादन


पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गोव्याच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही: केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान

गोवा खबर:गोव्यामध्ये विकास, संधी आणि यशाचे प्रारुप म्हणून उदयास येण्याचे सर्व घटक आहेत, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज- शुक्रवारी सांगितले. त्यांनी गोव्याचे वर्णन अशी जागा म्हणून केले जिथे  ‘विकास आणि गौरव ‘ ,  ‘ संधी आणि आशावाद’   आणि  ‘आकांक्षा आणि यश ‘  एकत्र येतात.

बेतोडा, फोंडा येथे स्वावलंबन, सेवा आणि ग्रामीण विकासाच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘सेवा की कहाणी, आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमात मंत्री संबोधित करत होते.

“जी म्हणजे ग्रोथ (विकास) आणि ग्लोरियस (गौरवशाली), ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी (संधी) आणि ऑप्टीमीझम(आशावाद), तर ए म्हणजे अॅस्पीरेशन्स (आकांक्षा) आणि अॅचीव्हमेंट(यश). स्वयंपूर्ण गोवा या तीन शब्दांतून प्रतिबिंबित होतो,” असे मंत्री म्हणाले.

या कार्यक्रमात मंत्र्यांनी ‘गोवा फ्रेश’ उत्पादनाचे अनावरणही केले आणि गोव्याच्या कृषी उत्पादनांना एक वेगळी ओळख देण्यासाठी आणि त्याची ओळख वाढवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे वर्णन केले.

शेतीसाठी राज्याच्या नैसर्गिक फायद्यांवर प्रकाश टाकत ते म्हणाले, “गोव्याच्या कृषी उत्पादनांना नवीन ओळख देण्याच्या दृष्टीने ‘गोवा फ्रेश’ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

“गोव्याची माती, जमीन, हवामान आणि पुरेसा पाऊस शेतीसाठी अत्यंत अनुकूल आहे. नारळ, काजू आणि मसाले ही गोव्याच्या कृषी समृद्धीची ओळख आहे. गोवा भौगोलिकदृष्ट्या लहान राज्य असले तरी त्याची क्षमता खूप मोठी आहे,” असे ते म्हणाले आणि आश्वासन दिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गोव्याच्या शेतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही आणि शेतकऱ्यांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही.

केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या विकास वाटचालीचे कौतुक केले आणि त्याचा उल्लेख  ‘सुवर्ण गोवा ‘  असा केला. ते म्हणाले की, राज्यात होत असलेल्या प्रगतीचे देशभरातून कौतुक होत आहे. “एकीकडे भाजप सरकार  ‘सुवर्ण गोवा ‘  बनवत आहे, तर दुसरीकडे संपूर्ण देश ‘ शाब्बास गोवा  ’ म्हणत आहे,” असे ते म्हणाले.———————– मंत्र्यांनी सांगितले की, गोव्याच्या विकासाच्या अनुभवातून इतरांना शिकण्यासारखे बरेच काही आहे. “गोवा अतिशय चांगली कामगिरी करत आहे आणि जगाने त्यातून शिकण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.

राज्याचा राजकीय आणि विकासाचा इतिहास सांगताना मंत्र्यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घातलेला विकासाचा पाया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्यात आला आहे.

“पर्रिकर यांनी गोव्याच्या विकासाचा पाया घातला आणि आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या पायावर विकासाचा प्रासाद उभारला आहे,” असे त्यांनी सांगितले. गोव्यातील रस्ते, उड्डाणपूल आणि प्रशासनाचा उल्लेख करत त्यांनी राज्याच्या विकासाची उदाहरणे दिली. “येथे सर्वत्र चांगले प्रशासन पाहायला मिळते,” असे ते म्हणाले.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, स्वयंपूर्ण गोव्याच्या अभियानात समाजातील प्रत्येक घटकाने योगदान दिले आहे. “या अभियानाचे वास्तवात रूपांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकरी, ग्रामीण युवक, महिला आणि लघु उद्योजकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून आपण लवकरच स्वावलंबी राज्य बनू,” असे त्यांनी सांगितले.

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात गोव्यातील शेती, ग्रामीण उपजीविका, उद्योजकता आणि समुदायाच्या सहभागातून होणाऱ्या विकासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. ‘गोवा फ्रेश’च्या शुभारंभासोबतच एफपीओ धोरणाचा प्रारंभ, राष्ट्रीय जलविज्ञान संस्था आणि गोवा कृषी संचालनालय यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी आणि कृषी अनुदानाचे वितरण करण्यात आले.

‘स्वयंपूर्ण गोवा’ अभियानाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात स्टार्ट-अप व्हिलेज उद्योजकता कार्यक्रमाचा शुभारंभ, लखपती दीदींचा सत्कार, बचत गटांना बँक कर्जाद्वारे आर्थिक मदत, पीएम-एफएमई योजनेअंतर्गत अन्न व्यवसायांना बीज भांडवल सहाय्य, बचत गटांच्या सदस्यांना गुलाबी रंगाच्या इलेक्ट्रिक रिक्षांना मंजुरी आणि एकात्मिक शेती समूहांना सहाय्य देण्याचे उपक्रमही पार पडले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार आणि विविध सरकारी विभागांचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यापूर्वी, स्वच्छता ही सेवा अभियानाचा एक भाग म्हणून, शिवराज सिंह चौहान यांनी मान्यवर आणि फोंडा येथील फार्मागुडी येथील पीईएस रवी नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या समवेत फोंडा येथील केटीसी बस स्थानकावर स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

Trending

Exit mobile version