गोवा खबर

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे बाल हेल्पलाईन कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने बाल हक्क, बाल संरक्षण आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना हाताळण्यासाठी बाल-स्नेही दृष्टिकोन यांविषयीची समज अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने बाल हेल्पलाइन कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष श्री शशिकांत पुनाजी यांच्या हस्ते झाले.

       यावेळी बोलताना श्री पुनाजी यांनी गोव्याच्या बाल संरक्षण प्रणालीमध्ये मुलांसाठी आणि समाजासाठी सहज उपलब्ध असलेले पहिले संपर्क केंद्र म्हणून ‘चाइल्ड हेल्पलाइन’ बजावित असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. जेव्हा एखादे मूल अत्याचार, दुर्लक्ष, शोषण, हिंसाचार, परित्याग किंवा संरक्षण आणि समर्थनाची आवश्यकता असलेल्या इतर परिस्थितींचा सामना करीत असते, तेव्हा ‘चाइल्ड हेल्पलाइन’चे कर्मचारी अनेकदा प्रतिसाद देणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी असतात यावर त्यांनी भर दिला.

       कर्मचाऱ्यांनी मुलांशी संवेदनशीलतेने, संयमाने आणि सेवेच्या भावनेने वागले पाहिजे आणि मुलांचे ऐकून घेणारे, त्यांच्या समस्या समजून घेणारे व त्यांना योग्य ती मदत आणि संरक्षण मिळवून देणारे “बालस्नेही सोबती” बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

       हे प्रशिक्षण श्री प्रवीण सबनीस यांनी घेतले होते, ज्यांनी मुलांसोबत काम करताना केवळ सहानुभूती दाखवण्यापलीकडे जाऊन, त्याऐवजी मुलाच्या वैयक्तिक गरजांनुसार योग्य तो दिलासा, भावनिक आधार आणि वेळेवर मदत देण्याच्या महत्त्वावर भर दिला.

       सुरुवातीला, आयोग सदस्या श्रीमती एस्थर टॉरेस यांनी चाइल्ड हेल्पलाइनच्या कार्यपद्धती आणि उपक्रमांचा आढावा सादर केला. या सत्रात मुलांच्या हक्कांचा आदर करणे, गोपनीयता आणि संवेदनशीलता राखणे, तसेच प्रकरणांची जबाबदारीने आणि बालक-स्नेही पद्धतीने हाताळणी सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावरही भर देण्यात आला.

       आयोगाच्या सदस्या श्रीमती. एस्थर टोरेस, श्रीमती. केतकी गडेकर, ॲड. सोफिया डिसोझा, श्रीमती. स्नेहल साळगावकर, श्रीमती. शलाका देसाई आणि श्रीमती. संजीवनी देसाई यावेळी उपस्थित होत्या. श्रीमती. केतकी गडेकर यांनी आभार मानले, तर श्रीमती. अनुपा मयेकर यांनी सूत्रसंचालन केले.

श्री आदित्य मुरगावकर, श्री मोहित शिरोडकर, श्री कृष्णा कोरगावकर, श्रीमती. रुही शिरोडकर व इतरांनी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

Trending

Exit mobile version