गोवा खबर

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी माध्यम प्रतिनिधींना गोव्यात निमंत्रण

Published

on

Spread the love

कथा, चित्रपट आणि जागतिक अभिव्यक्तींचा सोहळा : माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात

गोवा खबर:भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात इफ्फीचे (International Film Festival of IndiaI – FFI) पुन्हा एकदा गोव्यातील पणजी इथे पुनरागमन होणार आहे. यंदा या महोत्सवाच्या 57व्या पर्वाचे पणजी इथेच 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजन होणार असून, या निमित्ताने सिनेमांचे जग पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार आहे. भारत आणि जगभरातील चित्रपटकर्मी, चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ, पत्रकार आणि चित्रपटप्रेमींना एकत्र आणणाऱ्या यंदाच्या इफ्फीतून, कथात्मक मांडणीची जादू, चित्रपट अभिव्यक्तीमधील वैविध्यता आणि विविध संस्कृतींमधील प्रेक्षकांना परस्परांशी जोडणाऱ्या सर्जनशील भावनेचा सोहळाच साजरा होणार आहे.

या महोत्सवाअंतर्गत चित्रपटांचे खेळ, चर्चासत्रे, चित्रपटकर्मींशी संवाद आणि परस्परांसोबतचा आपला संपर्क विस्तारण्याची संधी अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कथा आणि दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. या सगळ्यातून कल्पना, संवाद आणि सहकार्यासाठीचे एक बहुआयामी व्यासपीठच उपलब्ध होणार आहे. या भव्य स्वरुपाच्या चित्रपट सोहळ्याच्या आयोजनासाठी गोवा सज्ज होत आहे, अशावेळी जागतिक चित्रपट समुदायासाठी सर्जनशील देवाणघेवाण आणि अर्थपूर्ण सहभागाची संधी उपलब्ध असावी याकरता इफ्फीच्या माधअयमातून अनोखे अवकाश उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दरवर्षी इफ्फीचा विस्तार आणि या सोहळ्याचे दृश्यात्मक अस्तित्व विस्तारण्यात माध्यम प्रतिनिधी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. बातम्या, मुलाखती, परीक्षणे, विशेष लेख आणि डिजिटल वार्तांकनाच्या माध्यमातून माध्यमे या महोत्सवातील चित्रपट, कार्यक्रम आणि चर्चा भारतभरातील तसेच जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात मदत करत असतात. यातून वैविध्यपूर्ण कलाकार आणि त्यांच्या कलेची गौरवपूर्ण दखल घेण्यात मदत होत असते. इफ्फीमध्ये माध्यमांच्या सातत्यपूर्ण सहभागाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण त्यामुळेच इफ्फीबद्दल तसेच सर्जनशील अभिव्यक्तीबद्दल व्यापक जागरूकता निर्माण होण्यास, तसेच या प्रक्रियेत लोकसहभाग वाढण्यास मोठी मदत होत असते.

माध्यम प्रतिनिधींसाठीची नोंदणी प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू

57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे म्हणजेच इफ्फी 2026 चे वृत्तसंकलन करण्याचे नियोजन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx या अधिकृत नोंदणी पोर्टलवर माध्यम प्रतिनिधी (Media Delegate) म्हणून नोंदणी करता येईल.

माध्यम प्रतिनिधींसाठी नोंदणीची प्रक्रिया आज, 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2026 असणार आहे.

नोंदणीकृत माध्यम प्रतिनिधींना महोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल. यात पुढील बाबींचा समावेश आहे :

  • चित्रपटांचे प्रदर्शन
  • चर्चासत्रे
  • चित्रपटकर्मी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांशी संवाद
  • परस्पर संपर्क विस्ताराच्या संधीचे उपक्रम
  • महोत्सवाच्या वृत्तसंकलनाशी संबंधित इतर उपक्रम

माध्यम प्रतिनिधींनी आपले अर्ज सादर करण्यापूर्वी नोंदणी मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचावीत, असे आवाहन करण्यात येत आहे आहे. अर्जदारांनी वैध ओळखपत्र, व्यावसायिक प्रमाणपत्रे, कार्यरत असलेले संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी, तसेच नोंदणी पोर्टलवर आवश्यक असलेली इतर सर्व आवश्यक दस्तऐवज सादर करणे बंधनकारक आहे.

पात्रतेचे तपशीलवार निकष आणि माध्यम नोंदणीसंबंधीच्या धोरणाची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज :

  • छायाचित्र
  • शासकीय ओळखपत्र
  • पत्र सूचना कार्यालय किंवा राज्य सरकारचे अधिस्वीकृती ओळखपत्र / संस्थेचे ओळखपत्र + संपादकांचे पत्र
  • संबंधित क्षेत्रातील कामाचा पुरावा

महत्त्वाची माहिती

  • महोत्सव : 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)
  • ठिकाण : पणजी, गोवा
  • माध्यम नोंदणीच्या प्रारंभाची तारीख : 1 ऑक्टोबर 2026
  • माध्यम नोंदणीची अंतिम तारीख : 15 ऑक्टोबर 2026
  • नोंदणीसाठीचे पोर्टल : https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx
  • अधिक सहकार्यासाठी ईमेल : iffi.mediadesk@pib.gov.in

इफ्फीच्या गतवर्षीच्या, म्हणजेच 56व्या पर्वासाठी पोर्टलवर आधीच नोंदणी केलेल्या माध्यम प्रतिनिधींना त्यांची जुनीच माहिती (लॉगिन तपशील) वापरून लॉगिन करता येईल, आणि आवश्यकतेनुसार आपले दस्तऐवज अद्ययावत करता येतील.

आशियातील या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट सोहळ्यात आपले स्थान निश्चित करण्यासाठी, चित्रपटसृष्टीला आयाम मिळवून देणाऱ्या अभिव्यक्तिंशी जोडले जाण्यासाठी, पडद्यामागील कथांचा शोध घेण्यासाठी आणि चित्रपटनिर्मिती, सर्जनशीलता तसेच संस्कृती विषयक इफ्फीच्या या बहुरंगी सोहळ्याचा भाग होण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. पहिल्या 50 यशस्वी नोंदणीकृत प्रतिनिधींना 19 नोव्हेंबर 2026 रोजी पणजी इथे आयोजित ‘फिल्म ॲप्रिसिएशन’ कार्यशाळेत मोफत सहभागी होण्याचीही संधी दिली जाणार आहे.

याशिवाय, माध्यम प्रतिनिधी नसलेले चित्रपटप्रेमी देखील https://www.iffigoa.org/delegate-registration या संकेतस्थळाद्वारे ‘प्रतिनिधी’ (Delegates) म्हणून इफ्फी साठी नोंदणी करू शकतात. त्यासाठी Delegate Registration येथे नोंदणी करून 57व्या इफ्फी 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या विविध चित्रपटांचा तसेच इतर उपक्रमांचा आनंद घेता येईल.

इफ्फीबद्दल

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीची 1952 मध्ये सुरूवात झाली होती. हा दक्षिण आशियातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा चित्रपट सोहळा आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एनएफडीसी) आणि गोवा राज्य सरकारची ‘एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा’ (ईएसजी) यांच्या वतीने संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटकर्मी, आघाडीचे प्रतिथयश कलाकार आणि उदयोन्मुख अभिव्यक्ती एकत्र येत असतात. गोव्याच्या आल्हाददायी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होणाऱ्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मास्टरक्लास अर्थात दिग्गजांच्या कार्यशाळा आणि विशेष गौरव सत्रांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कथा, भाषा आणि चित्रपट परंपरांचा गौरव केला जातो. 56व्या इफ्फी 2026 संदर्भातील अधिक माहिती आणि अद्ययावत तपशीलांसाठी www.iffigoa.org या संकेतस्थळाला भेट द्या.

Trending

Exit mobile version