गोवा खबर: विमान कंपन्यांना इंधन दरवाढीचा आणखी एक फटका बसला आहे. गुरुवारपासून एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) अर्थात विमान इंधनाच्या दरात प्रतिलिटर तब्बल 16 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे 62.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी ही दरवाढ केली आहे.
तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी एटीएफचा दर प्रतिलिटर 121 रुपयांवरून 137 रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये एटीएफच्या दरात प्रतिलिटर 6.28 रुपये म्हणजेच 5.46 टक्के वाढ करण्यात आली होती. ऑगस्टमध्येही प्रतिलिटर 5 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सलग तिसऱ्या महिन्यात विमान इंधन महाग झाले आहे.
विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा वाटा जवळपास 40 टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे एटीएफच्या किमतीतील मोठी वाढ विमान कंपन्यांच्या खर्चावर परिणाम करणारी ठरू शकते.
दरम्यान, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 62.59 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये या सिलिंडरच्या दरात 9.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये 192 रुपये आणि जुलैमध्ये 183.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.
फेब्रुवारी ते जून या कालावधीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. या काळात सिलिंडरचा दर 1,740.50 रुपयांवरून 3,113.50 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये दर कमी करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर आणि रुपया-डॉलर विनिमय दरातील बदल लक्षात घेऊन एटीएफ आणि एलपीजीच्या किमतींचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. स्थानिक व्हॅटसारख्या करांमुळे राज्यनिहाय अंतिम दर वेगवेगळे असू शकतात.
मात्र, घरगुती ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 942 रुपये कायम ठेवण्यात आला आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.