गोवा खबर: गोव्यात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यात मान्सून काळात सरासरी ३००८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा केवळ २०५५ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ ‘डी’ आणि प्रमुख नहुष प्रकाश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
राज्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची मोठी तूट दिसून आली. उत्तर गोव्यात सरासरीपेक्षा ३७ टक्के कमी, तर दक्षिण गोव्यात २७ टक्के कमी पाऊस नोंदवण्यात आला. पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत पूर्वेकडील आणि घाटमाथ्याजवळील भागात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहिले.
राज्यात वाळपई येथे सर्वाधिक २८३६ मिमी पावसाची नोंद झाली. तर पणजीत सर्वांत कमी १३८५ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. त्यामुळे यंदा राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात मोठी तफावतही दिसून आली.
मान्सूनच्या चारही प्रमुख महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिला. जूनमध्ये ३५ टक्के, जुलैमध्ये ३३ टक्के, ऑगस्टमध्ये २० टक्के आणि सप्टेंबरमध्ये तब्बल ४४ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली. चार महिन्यांपैकी सप्टेंबरमध्ये पावसाची सर्वाधिक कमतरता राहिली.
हवामान खात्याकडील मागील काही दशकांची आकडेवारी पाहिल्यास यंदाची पावसाची तूट विशेष लक्षणीय असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. विशेषतः १९८१ नंतरच्या उपलब्ध नोंदींची तुलना केल्यास यंदाचा मान्सून सर्वाधिक तुटीचा ठरला आहे. यापूर्वी २००६ मध्ये २९ टक्के, तर १९८६ मध्ये २३ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली होती.
यंदा पाऊस कमी होण्यामागे अनेक हवामानविषयक कारणे असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. अल निनोचा प्रभाव हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. अल निनो सक्रिय राहिल्याने मान्सूनच्या पावसावर परिणाम झाला. त्याचबरोबर गोवा आणि पश्चिम किनारपट्टीवर चांगला पाऊस देण्यासाठी आवश्यक असलेल्या काही अनुकूल हवामान प्रणाली यंदा पुरेशा प्रमाणात सक्रिय झाल्या नाहीत.
मान्सूनच्या काळात पावसासाठी महत्त्वाचा असणारा ऑफशोर ट्रफ आणि इतर संबंधित प्रणालीही तुलनेने कमकुवत राहिल्या. जूनच्या सुरुवातीला दक्षिण चीन समुद्रातील चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातील आर्द्रतेच्या प्रवाहावरही परिणाम झाला. त्याचा परिणाम मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातील पावसावर झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही गोव्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मान्सून हंगाम संपल्यानंतरही पावसात मोठी वाढ होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे संकेत आहेत.
अल निनोचा प्रभाव पुढील काही महिने म्हणजेच मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा गोव्याच्या हिवाळ्यावर नेमका किती परिणाम होईल, हे आताच निश्चित सांगता येणार नाही. गोव्यातील हिवाळ्यातील तापमान हे पश्चिमी विक्षोभ आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.
त्यामुळे आगामी हिवाळ्यात गोव्यात थंडीचे प्रमाण कसे राहील, याबाबत हवामान विभागाकडून पुढील काळात अधिक स्पष्ट अंदाज दिला जाईल, असे नहुष प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.