गोवा खबर: मतदार यादीत अद्याप नाव नोंदवले गेलेले पात्र नागरिक तसेच नव्याने मतदानासाठी पात्र ठरलेल्या तरुण मतदारांची नोंदणी करण्यासाठी गोव्यात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात येत असल्याची माहिती गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
या मोहिमेत विशेषतः मतदार यादीत नाव राहून गेलेले पात्र नागरिक, तरुण मतदार आणि प्रथमच मतदानासाठी पात्र ठरलेल्या मतदारांच्या नोंदणीवर भर दिला जाणार आहे.
मतदार याद्यांच्या सातत्यपूर्ण अद्ययावतीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून ही मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी भेटी देणार असून पात्र नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे.
एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.
ज्या पात्र नागरिकांची नावे अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत, त्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवले आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.