गोवा खबर:एसआयआर (SIR) प्रकरणावरून काँग्रेससह विरोधी पक्ष जनतेची नाहक दिशाभूल करत असल्याचा जोरदार आरोप भाजपचे प्रवक्ते सिद्धेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस सर्वानंद भगत आणि प्रवक्ते ॲड. यतीश नाईक उपस्थित होते.
सिद्धेश नाईक यांनी सांगितले की, एसआयआर ही कोणतीही नवीन प्रक्रिया नसून १९५० च्या दशकापासून सुरू झालेली एक नियमित कायदेशीर प्रशासकीय प्रक्रिया आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात अशी प्रक्रिया जवळपास १० वेळा राबवली गेली आहे. मतदार यादीत किंवा नोंदींमध्ये झालेली चुकीची नावे, स्थलांतरित व्यक्ती अथवा मयत झालेल्या व्यक्तींची नावे हटवून नोंदी अद्ययावत (अपडेट) करण्याचे काम या प्रक्रियेअंतर्गत केले जाते.
पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली की, केंद्र व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सर्व स्तरांवर वेगाने विकासकामे होत असल्याने विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष निरर्थक मुद्द्यांवरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया झाल्यानंतरही काँग्रेस सत्तेवर आली होती; तेव्हा काँग्रेसने या प्रक्रियेवर कोणतेही प्रश्न उपस्थित केले नव्हते. मात्र, ज्या राज्यांमध्ये पराभव निश्चित दिसतो, तिथे काँग्रेसकडून निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त घटनात्मक संस्थेवर संशय व्यक्त केला जातो, असा टोला त्यांनी लगावला.
तसेच राहुल गांधी देशात आणि परदेशात जाऊन स्वायत्त घटनात्मक संस्थांवर बोट ठेवत भारताच्या लोकशाहीची आणि देशाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नाईक यांनी केला. याशिवाय शरजील इमाम, उमर खालिद यांच्यासारख्या घटकांना काँग्रेसकडून मिळणारी सहानुभूती ही निंदनीय असल्याचे सांगत, काँग्रेसच्या या दुटप्पी भूमिकेचा भाजपतर्फे त्यांनी जाहीर निषेध नोंदवला.