गोवा खबर

भारत मंडपम येथे 9 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 चे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर:उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे 9 व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय जल सप्ताह’ (आयआयडब्ल्यूडब्ल्यू) 2026 चे उद्घाटन केले. जलशक्ती मंत्रालयाने 22 ते 26 सप्टेंबर या कालावधीत आयोजित केलेला हा पाच दिवसीय कार्यक्रम “हवामान अनुकूल जल व्यवस्थापन” या संकल्पनेवर केंद्रित आहे.

उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी सांगितले की, पाणी हा जीवनाचा आणि नागरी संस्कृतींचा आधार आहे. तसेच त्यांनी पाण्याचा विवेकी वापर, संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या गरजेवर भर दिला.

भारताचा नद्यांशी असलेला सांस्कृतिक संबंध अधोरेखित करून, उपराष्ट्रपती म्हणाले की, भारतीय समुदायांनी शतकानुशतके पाण्याचे संवर्धन, वितरण आणि व्यवस्थापन यासाठी समृद्ध परंपरा आणि पद्धती विकसित केल्या आहेत. ते म्हणाले,”आजच्या पाणीविषयक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आपले पारंपरिक शहाणपण मोलाचे धडे देते.”

उपराष्ट्रपतींनी नमूद केले की, जगातील सुमारे 2.4 टक्के भूभाग आणि 18 टक्के लोकसंख्या भारतात आहे. मात्र, जगातील गोड्या पाण्याच्या साठ्यापैकी केवळ 4 टक्के जलसंपदा भारताकडे आहे. ते म्हणाले की भारताच्या पाण्याच्या वापराच्या गरजांची तुलना, पाण्याची अधिक उपलब्धता आणि कमी लोकसंख्या असलेल्या देशांच्या गरजांशी करता येणार नाही.

विशेषतः कृषी क्षेत्राकडून पाण्याची असलेली मोठी मागणी आणि उद्योगांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, त्यांनी पाण्याचा कार्यक्षम वापर, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. तसेच, त्यांनी पाणी व्यवस्थापनामध्ये केवळ परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीकडून, भविष्याचा अंदाज घेणाऱ्या आणि तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीकडे वळण्याचे आवाहन केले.

सर्व सहभागींनी ज्ञानाचे आदानप्रदान करावे, भागीदारी निर्माण करावी आणि जलसंवर्धनासाठी वचनबद्ध व्हावे, असे आवाहन करत उपराष्ट्रपती म्हणाले, “जलसुरक्षेमुळेच जनसुरक्षा आणि राष्ट्रसुरक्षा साध्य होईल.”


Trending

Exit mobile version