केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यातील नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना नियुक्तीपत्रे दिली
गोवा खबर:20 व्या देशव्यापी रोजगार मेळाव्याचा एक भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी संस्थांमध्ये नवीन नियुक्ती मिळालेल्या युवक-युवतींना 51,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. गोव्यात पणजी येथे हा रोजगार मेळावा केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि सीमाशुल्क आयुक्तालयाने आयोजित केला होता.
केंद्रीय उर्जा आणि नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून गोव्यातील विविध केंद्र सरकारी संस्था आणि कार्यालयांमध्ये नियुक्ती झालेल्या 53 युवकांना नियुक्तीपत्रे दिली.
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच सीमाशुल्क विभागाचे गोव्याचे आयुक्त सुबोध सिंग यांच्यासह वरीष्ठ अधिकारी, मान्यवर, नवनियुक्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांचे भाषण झाले आणि त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातील रोजगार मेळाव्यांमधील युवा पिढीशी संवाद साधला.
नव्याने नियुक्त झालेले 53 युवक युवती बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, टपाल विभाग, रेल्वे, केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळ, सीमाशुल्क विभाग आणि गोवा आयआयटी यासारख्या महत्त्वाच्या केंद्रिय सरकारी संस्थांमध्ये आपली कारकीर्द सुरू करतील.
कार्यक्रमात बोलताना श्रीपाद नाईक यांनी नवीन नियुक्तीपत्रे मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि लोकसेवा व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की सरकारी नियुक्ती म्हणजे केवळ नोकरीची संधी नाही, तर नागरिकांची सेवा करण्याची आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी आहे.
आपले कौशल्य सातत्याने अद्ययावत करण्याचा व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला त्यांनी नवनियुक्त युवा कर्मचाऱ्यांना दिला. विशेषतः डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, पायाभूत सुविधा, बँकिंग, रेल्वे, विमानउड्डाण, शिक्षण व नवीकरणीय उर्जा यासारख्या क्षेत्रांमधील उदयोन्मुख तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांनी या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी या युवक युवतींच्या यशामधील पालक, कुटुंबिय, शिक्षक व मार्गदर्शकांच्या योगदानाचा उल्लेख केला.
या रोजगार मेळाव्यातून नवनियुक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासाच्या नव्या टप्प्याच्या आरंभाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. युवा पिढीची सार्वजनिक सेवा बळकट करण्यामधील भूमिका आणि विकसित भारत 2047 या संकल्पपूर्तीमधील योगदान यावर कार्यक्रमामध्ये विशेष भर देण्यात आला.
नियुक्तीपत्रे मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विकासाभिमुख उपक्रमांबाबतचे आपले मत मांडले आणि रोजगार मेळावा अभियानातून नियुक्तीपत्र मिळाल्यानंतरचे आपले अनुभव सांगितले.
युवा पिढीसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्यांचा मोठा सहभाग असेल याकडे लक्ष देण्यावर केंद्र सरकार सातत्याने भर देत आहे, याचे प्रतिबिंब या रोजगार मेळाव्यात पाहायला मिळाले. 20 व्या रोजगार मेळाव्यानंतर एकूण 12.75 लाख युवक युवतींना विविध सरकारी विभाग व संस्थांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत.