गणेशोत्सवात गुरुजी न मिळण्याची चिंता सोडा!
घरच्या घरी स्वतः करा शास्त्रोक्त पूजा!
गोवा खबर:श्री गणेश चतुर्थीचा मंगलमय क्षण आता जवळ आला आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या धावपळीच्या काळात अनेक भाविकांना वेळेवर पुरोहित (गुरुजी) उपलब्ध न होण्याची मोठी अडचण भेडसावते. हीच समस्या ओळखून, प्रत्येक गणेशभक्ताला घरातल्या घरात अत्यंत भावपूर्ण आणि शास्त्रोक्त पद्धतीने स्वतः श्री गणेश स्थापना व पूजा करता यावी, यासाठी ‘सनातन संस्थे’च्या वतीने एका विशेष आणि स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ७.०० वाजता संस्थेच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर ‘श्री गणेशपूजे’चे थेट प्रक्षेपण (Live Streaming) करण्यात येणार आहे.
या विशेष थेट प्रक्षेपणामध्ये पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य, अचूक पूर्वतयारी आणि मांडणी कशी करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच, पूजेचा शास्त्रोक्त क्रम आणि सर्वसामान्यांना सहज उच्चारता येतील अशा सोप्या मंत्रांविषयी माहिती दिली जाणार आहे. वेद मंत्रोच्चारांच्या पवित्र गजरात प्रत्यक्ष श्री गणेशपूजा, प्राणप्रतिष्ठा विधी, भावपूर्ण आरती आणि संकटनाशन स्तोत्र पठण यासोबतच पूजेच्या वेळी कोणती विशेष काळजी घ्यावी, याचेही सविस्तर मार्गदर्शन या सत्रात मिळणार आहे.
गुरुजी उपलब्ध नसले तरी आता कोणाचीही गैरसोय होणार नाही किंवा पूजेत कोणतीही अडचण येणार नाही. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून कुणीही भाविक स्वतःच्या हाताने बाप्पाची शास्त्रोक्त पूजा करू शकेल आणि श्री गणेशकृपा संपादन करू शकेल, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. तरी या अत्यंत उपयुक्त आणि मंगलमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व गणेशभक्तांनी उद्या सकाळी मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी व्हावे, असे भावपूर्ण आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
* थेट प्रक्षेपणाची वेळ : १४ सप्टेंबर २०२६, सकाळी ७.०० वाजता
* थेट प्रक्षेपणाची लिंक (YouTube) : https://www.youtube.com/watch?v=0X9zrBSYPsY