गोवा खबर

गोमंतकाच्या अधिदैवताचे पुनर्स्थापन

Published

on

Spread the love

श्री सप्तकोटेश्वर व कोटीतीर्थ जोर्णोद्धार ; डॉ. भूषण भावे

शुक्रवार ४  सप्टेंबर रोजी स. ९ वाजता पोर्णें तीर्थ, दिवाडी येथे कोटीतीर्थ कोरिडोर विकास प्रकल्प ह्या गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याच्या प्रकल्पाची सुरवात म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्यातर्फे श्री हाटकेश्वर व कोटीतीर्थ येथे महाभिषेक, उदकशांती व मांडवी पंचगंगा आरती इ. धार्मिक विधी व प्रकट सभेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त हा खास लेख. गोवा : पश्चिम किनारपट्टीवरील भारताची काशी ! फार प्राचीन काळापासून गोमंतक – गोवा ही पवित्र भूमी, देवभूमी म्हणून ओळखली जाते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशाला पुराणपरंपरेत ‘आनंदवनकानन’ असे संबोधले गेले आहे. सह्याद्रीची बलदंड पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला अथांग हिंद महासागर यांच्या सान्निध्यात वसलेली ही भूमी केवळ भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण नाही, तर धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. परशुरामभूमीची पुराणपरंपरा गोव्याच्या प्राचीनत्वाचा संबंध भगवान परशुरामांशी जोडला जातो. महाक्रोधी परशुराम या भूमीत आल्यानंतर शांताराम झाले, अशी लोकश्रद्धा आहे. दशप्रहरणधारिणी कालीदुर्गा गोमंतकात आल्यानंतर शांतादुर्गा झाली, तर महाभयंकर नृसिंह येथे निराकार स्तंभरूपात स्थायिक झाले, अशीही श्रद्धा आहे.

भगवान परशुरामांनी समुद्र मागे हटवून ही भूमी निर्माण केली, अशी पुराणकथा प्रसिद्ध आहे. या कथेमागे समुद्रापासून भूमी निर्माण होण्याची एखादी प्राचीन भौगोलिक वा वैज्ञानिक प्रक्रिया लोकस्मृतीत कथारूपाने जतन झालेली असावी, असे मानता येते.

या भूमीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरा म्हणजे समुद्राला घातलेली मर्यादा. भूमी निर्माण केल्यानंतर परशुरामांनी समुद्राला, “तुझ्या पाण्याची मर्यादा या रेषेपलीकडे जाऊ नये,” अशी आज्ञा दिली, अशी आख्यायिका आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी आढळणाऱ्या मारवेल नावाच्या वेलीला काही स्थानिक परंपरांमध्ये या मर्यादावेलीशी जोडले जाते. समुद्रापासूनच ही भूमी निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर नैसर्गिक पूर आल्याची उदाहरणे सापडत नाहीत, मौर्यांपासून गोव्याच्या राजकीय इतिहासाची वाटचाल पुराणपरंपरेनंतर गोव्याच्या इतिहासावर विविध राजसत्तांचा प्रभाव पडत गेला. सा.श. पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्याच्या काळात सम्राट अशोकाच्या प्रभावामुळे बौद्ध धर्माचा प्रारंभिक प्रसार या प्रदेशात झाल्याचे मानले जाते. त्यानंतर सातवाहनांच्या काळात गोव्याचा सागरी व्यापार वाढला आणि रोमन जगताशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. पुढे पश्चिमी क्षत्रप, आभीर, भोज आदी विविध सत्तांचा कोंकणावर प्रभाव राहिला. त्यानंतर बदामीचे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांनी गोव्याला दख्खनच्या व्यापक राजकीय व्यवस्थेशी जोडले. या दीर्घ इतिहासात भोज, मौर्य, शिलाहार, कदंब आणि विजयनगर यांसारख्या राजवटींनी गोव्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला मोठी चालना दिली. संपूर्ण कोंकणाचे महत्त्व वाढवतानाच गोव्याला कोंकणातील एक महत्त्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली. सौराष्ट्र (काठेवाड), बर्बर (गुजरातची किनारपट्टी), करहाट (ठाणे, कुलाबा, रत्नागिरी), गोमंतक (सिंधुदुर्ग, गोवा, कारवार), कर्नाट (कर्नाटकाचा किनारपट्टी), तुलुंग (तुळू भाषिक प्रदेश) व केरल ह्या सात महासप्तमाची (साताकोंकणाची) राजधानी एवगे महत्त्व गोव्याला प्राप्त झाले.

कदंबांचे सुवर्णयुग

गोव्याच्या इतिहासातील सर्वाधिक वैभवशाली कालखंडांपैकी एक म्हणजे कदंब राजवट. साधारणपणे शके १००८ ते १३०० या कालखंडात कदंबकुलाने गोव्याहून राज्य केले. प्रारंभी चंद्रपूर अर्थात चांदोर आणि नंतर गोपकपट्टण या केंद्रांतून त्यांनी राज्यकारभार केला. कदंबांनी कला, स्थापत्य, प्रशासन, व्यापार आणि संस्कृतीला मोठी चालना दिली. झांझीबारपासून सुमात्रापर्यंतच्या विविध राष्ट्रांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाल्यामुळे गोमंतक प्रदेश समृद्ध आणि वैभवशाली बनला.

कदंब राजांचे श्री सप्तकोटेश्वरहे कुलदैवत व कुलदेवी श्री चामुंडा होती. ‘श्री सप्तकोटेश्वर लब्धवरप्रसाद’ हे बिरुद ते अभिमानाने  धारण करीत. त्यांचे राजचिन्ह  सिंह होते. गोव्याच्या प्राचीन परंपरेत सिंहाला असलेले महत्त्व लक्षात घेता काही शिलालेख आणि ताम्रपटांत गोव्याचा ‘सिंहल’ असा उल्लेख आढळतो. याच कालखंडात दिवाडी बेटावरील श्री सप्तनाथ-सप्तकोटेश्वर, श्री गणनाथ आदी मंदिरांचा जीर्णोद्धार झाल्याचे संदर्भ आढळतात. बाराव्या शतकात कदंबांनी उभारलेले हे भव्य मंदिर पुढे चौदाव्या शतकाच्या मध्याला दख्खनच्या सुलतानाने म्हणजे बहामनी काळात अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूरने उद्ध्वस्त केले. ह्या काळातील इतिहास कोंकण-आख्यानात असा शब्दबद्ध करण्यात आला आहेः

म्लेछांनी केला उत्पात

देवांसि अनर्थ आरंभिला

श्री सप्तकोटेश्वर देवासी

उपडून चिखली घातिला बांधासी

कदंब राजवटीनंतर आलेल्या विजयनगर साम्राज्याचा मंत्री श्री. माधव मंत्री यांने चौदाव्या शतकाच्या अखेरीस ते पुन्हा बांधले, अशी साक्ष मिळते. ‘सोन्याचे कोंकण आणि ‘सुवर्ण गोवा’ गोव्याचे प्राचीन वैभव केवळ धार्मिक नव्हते. व्यापार-वाणिज्याच्या दृष्टीनेही तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मध्यवर्ती आणि मोक्याचे भौगोलिक  स्थान असल्यामुळे गोवा प्राचीन काळापासून एक समृद्ध व्यापारी केंद्र—म्हणून विकसित झाला. स्कंदपुराणाच्या सह्याद्री खंडात गोव्याचा ‘कोंकणकाशी’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखातील ‘सुनापरांत’ या उल्लेखाचा संबंध सोन्याची भूमी किंवा सुवर्ण कोकण या अर्थाशी जोडला जातो. तत्कालीन शिलालेख आणि ताम्रपटांमध्ये या प्रदेशाची तुलना सोन्याची लंका आणि इंद्राची अमरावती यांच्याशी केली जात असल्याचे संदर्भ आढळतात. नंतरच्या काळात युरोपीय प्रवाशांनीही गोव्याच्या संपन्नतेचे वर्णन केले आणि ‘गोवा दोरादो’—सोन्याचा गोवा अशी त्याची ख्याती झाली.म्हणजेच, पुराणपरंपरेतील गोमंतक, धार्मिक परंपरेतील तीर्थभूमी, संस्कृत-वैदिक परंपरेतील विद्याभूमी आणि व्यापारी जगतातील सुवर्णभूमी – या सर्व ओळखी एकाच प्रदेशात एकवटलेल्या होत्या.

काशीप्रमाणेच गोवा – मुक्ती आणि विद्येचे क्षेत्र

मुक्तिक्षेत्र आणि संस्कृत विद्येचे माहेरघर म्हणून काशी प्रसिद्ध आहे. या दोन्ही बाबतींत गोव्याचे काशीशी साम्य असल्याची प्राचीन परंपरा आहे. गोकर्णादुत्तरे भागे शतयोजन विस्तृतम् । तस्य गोवापुरी नामनगरी पापनाशिनी ॥ अर्थात, सुप्रसिद्ध गोकर्ण क्षेत्राच्या उत्तरेला गोवापुरी नावाचे पापनाशक क्षेत्र आहे, अशी या परंपरेत कल्पना आहे. दिवाडी बेटाजवळ पंचनद्यांचे (म्हादईच्या शाखा), गोमती अर्थात मांडवी व अघनाशिनी अर्थात झुआरी नदीचे समुद्राशी होणारे संगमक्षेत्र अत्यंत पवित्र मानले गेले. या पवित्र संगमामुळे दिवाडी-नार्वे परिसराला प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले.

श्री सप्तकोटेश्वर : कोंकणभूमीचे अधिष्ठान

दिवाडीतील नार्वे परिसराच्या पावित्र्याशी श्री सप्तकोटेश्वर देवस्थानाची परंपरा निगडित आहे. आख्यायिकेनुसार सप्तऋषींनी सात कोटी वर्षे तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले आणि सात धातूंच्या मिश्रधातूपासून शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून या दैवताला सप्तकोटेश्वर हे नाव प्राप्त झाले. या पवित्र शिवलिंगाचे केवळ दर्शन केल्याने पापनाश आणि स्पर्शाने मुक्ती प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच ‘क्षेत्रं यवाधिकं काश्याः’ हे क्षेत्र काशीपेक्षा जवभर अधिक श्रेष्ठ  आहे, अशी भक्तिपरंपरेतील भावना व्यक्त होते.  श्री सप्तकोटेश्वर हे केवळ गोव्याचे नव्हे, तर संपूर्ण कोंकणपट्टीचे अधिष्ठानदैवत मानले जाते. काशीप्रमाणेच गोवा हे तीर्थयात्रा आणि विद्येचे केंद्र होते, ही बाब गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे वैशिष्ट्य अधोरेखित करते. यात्रेची परंपरा आणि पोर्तुगीज आक्रमण या पवित्र क्षेत्रात पुराणकाळापासून हजारो हिंदू तीर्थयात्रेसाठी येत असत. येथे होणारी महायात्रा श्रावण वद्य अष्टमी अर्थात जन्माष्टमी, गोकुळाष्टमीच्या दिवशी भरत असे. परंतु सा.श. 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकल्यानंतर या परंपरेवर मोठा आघात झाला. तिसवाडीतील मंदिरे नष्ट करण्यात आली, तीर्थक्षेत्रे भ्रष्ट करण्यात आली आणि हिंदू समाजाला आपल्या धार्मिक केंद्रांपासून दूर करण्याचा प्रयत्न झाला. मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण करण्याचे पोर्तुगीजांचे दिवाडी हे पहिलेच गाव होते. याच काळात नार्वे, दिवाडी, येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्याची परंपरा पुढे डिचोली तालुक्यातील त्याच नावे नार्वे गावात स्थलांतरित झाली.

जेजुईत इतिहासकार फादर फ्रान्सिस्को द सौझा यांनी आपल्या Oriente Conquista या ग्रंथात दिवाडीच्या मंदिराचे आणि तेथील तीर्थपरंपरेचे महत्त्व नोंदविले आहे. त्यांच्या लेखनानुसार, दिवाडी हिंदूंसाठी तितकेच पवित्र होते, जितके ख्रिस्ती लोकांसाठी पवित्र भूमी. मंदिर नष्ट झाल्यानंतरही विशिष्ट दिवशी हिंदू तेथे मोठ्या संख्येने येत आणि मूळ मंदिराच्या समोरील नदीपात्रात स्नान करून धार्मिक पुण्यलाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत. श्री सप्तकोटेश्वर बरोबरच जवळच्याच श्री हाटकेश्वर या देवाचेही दर्शन घ्यायची प्रथा या काळात पडली असावी. लिओनार्डो पेस यांच्या Prontuario das Definicoes Indicas या ग्रंथातील वर्णनही गोव्याच्या मंदिरसमृद्ध परंपरेची साक्ष देते. त्यांच्या नोंदीनुसार, गोव्यात मंदिरे इतकी विपुल होती की शहरे, गावे आणि वस्तीच नव्हे, तर उंच टेकड्या, बेटे आणि कड्यांवरही मंदिरे आढळतात. 12 व्या शतकातील तांबडी सुर्ल येथील शिवमंदिर, विजयनगरच्या राजवटीतील बांदिवडे येथील स्वयंभू श्री नागेश, विशेषतः शिरोड्याचा व अनेक गावांतील श्री शिवनाथ, मूळ कुठ्ठाळीचा व सध्या मंगेशी येथील श्री मंगेश, बोरीचा श्री सिद्धनाथ, पारोड्याचा श्री चंद्रनाथ, कदंब राजवटीतील दिवाडी येथील प्रस्तुत व पुढे स्थलांतरीत झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील नार्वे, डिचोली येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर यांच्या रुपात प्राचीन काळापासून गोव्यात व उर्वरीत कोंकणात शिवभक्तीची प्राचीन परंपरा आहे. गोव्याला ‘पूर्वेचे रोम’ बनविण्याचा प्रयत्न सा.श. 1498 मध्ये वास्को द गामाने भारताकडे येणारा सागरी मार्ग शोधल्यानंतर पोर्तुगीजांनी आफ्रिका आणि आशियाच्या किनारपट्टीवर आपला प्रभाव झपाट्याने वाढविला. मोझांबिकपासून मकावपर्यंत बंदरे आणि प्रदेशांची साखळी असलेले विशाल साम्राज्य त्यांनी उभे केले. अशा परिस्थितीत त्यांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी म्हणून गोव्याचीच निवड का झाली? कारण गोवा आधीपासूनच व्यापार-वाणिज्याचे समृद्ध केंद्र होते. त्याचे भौगोलिक स्थान अत्यंत मोक्याचे होते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, गोवा हा भारतीयांच्या दृष्टीने पवित्र तीर्थक्षेत्र आणि वैदिक-संस्कृत विद्येचे केंद्र होता. याच कारणामुळे पोर्तुगीजांनी गोव्याला चर्च, चॅपेल, सेमिनरी आणि कॉन्व्हेंट्सच्या माध्यमातून ख्रिस्ती धार्मिक केंद्राचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव मकांवहून आणून बॉम जिझसच्या कॅथेड्रलमध्ये ठेवण्यात आले आणि त्याच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेची परंपरा निर्माण करण्यात आली. अशा प्रकारे गोव्याच्या आधीच्या तीर्थपरंपरेला पर्यायी धार्मिक केंद्र उभे करण्याचा प्रयत्न झाला.

मंदिरांचा विध्वंस

सा.श. 1510 मध्ये पोर्तुगीज सत्तेची सुरुवात झाल्यानंतर गोमंतकाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर मोठे संकट आले. शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि  विद्याकेंद्रे बळकावून त्यांच्या जागी चर्च उभारण्यात आली. दिवाडीतील श्री सप्तकोटेश्वर मंदिरही  या विध्वंसातून सुटले नाही. मात्र मंदिर उद्ध्वस्त झाले, तरी परंपरा नष्ट झाली नाही. दैवताची  उपासना आणि भक्तांची श्रद्धा पुढे चालू राहिली. मूळ देवस्थानाच्या परंपरेचे स्थलांतर डिचोली तालुक्यातील नार्वे येथे झाले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सा.श. १६६८ मध्ये श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे मंदिराच्या पुनरुज्जीवनाला केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले. मूळ दिवाडी मंदिराचे स्थान आजही पोर्णें तीर्थ म्हणून स्मरणात आहे. सप्तकोटेश्वराची परंपरा, दिवाडीचे तीर्थक्षेत्र आणि नार्वे येथील देवस्थान या सर्वांचा इतिहास गोव्याच्या अस्मितेशी अभिन्नपणे जोडलेला आहे. परंपरा टिकली, यात्रा क्षीण झाली डिचोली तालुकाही पुढे पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यानंतर गोकुळाष्टमीची ही प्राचीन यात्रा क्षीण होत गेली. तरीही तिची परंपरा पूर्णपणे लोप पावली नाही. आजही गोकुळाष्टमीच्या दिवशी शेकडो हिंदू या यात्रेसाठी येतात. यातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते, राजसत्ता बदलू शकते, मंदिरे उद्ध्वस्त होऊ शकतात; परंतु श्रद्धा आणि सांस्कृतिक स्मृती सहज नष्ट होत नाहीत. आजची गरज: मूळ स्थानी पुनर्स्थापना गोव्याच्या मुक्तीला सहा दशके उलटून गेली आहेत. तरीही पर्यटनाच्या क्षेत्रात आणि काही वेळा सरकारी व बिगर-सरकारी प्रचारामध्ये गोव्याला ‘पूर्वेचे रोम’ म्हणून मांडण्याची प्रवृत्ती दिसते. गोव्याचा इतिहास मात्र त्यापेक्षा कितीतरी व्यापक आणि प्राचीन आहे. गोवा हा केवळ चर्च आणि वसाहतवादी वास्तूंचा प्रदेश नाही. तो परशुरामभूमी आहे; तीर्थभूमी आहे; मंदिरांची भूमी आहे; वैदिक आणि संस्कृत विद्येची भूमी आहे; कदंबांच्या वैभवाची भूमी आहे; सागरी व्यापाराचे  प्राचीन केंद्र आहे. म्हणूनच गोव्याची अधिक समर्पक ओळख अशी असली पाहिजे – ‘पश्चिम  किनारपट्टीवरील भारताची काशी!’ हल्लीच गोवा सरकारने श्री सप्तकोटेश्वर मंदिर आणि कोटीतीर्थाच्या जीर्णोद्धाराची घोषणा केली आहे. ही केवळ एका मंदिराच्या दुरुस्तीची बाब नाही. हा हजारो वर्षांच्या तीर्थपरंपरेचा, ज्ञानपरंपरेचा आणि सांस्कृतिक स्मृतीचा पुनर्शोध आहे. परकीय आक्रमणांनी उद्ध्वस्त केलेल्या मूळ स्थानीच मंदिरे पुन्हा उभी करण्याची परंपरा आता दृढ होत आहे. श्री महालसा (वेर्णे) यांसारख्या मंदिरांच्या पुनरुज्जीवनाच्या परंपरेत श्री सप्तनाथ- सप्तकोटेश्वराच्या मूळ तीर्थक्षेत्राच्या पुनर्स्थापनेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. अवशेष म्हणून आज या ठिकाणी कोटीतीर्थ तळ्याचा भाग शिल्लक आहे. त्यामधील त्यामध्ये 108 देवकोष्ठांनी  वेढलेले पाण्याचे कुंड आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे.  मंदिर उभारण्या बरोबरच गोव्याच्या विस्मृतीत गेलेल्या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारशाचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. गोमंतकाच्या या सुवर्ण परंपरेचे पुनर्स्मरण करून, श्री सप्तकोटेश्वराच्या मूळ स्थानी होणाऱ्या पुनरुज्जीवनाच्या ऐतिहासिक कार्यात तन-मन-धनपूर्वक सहभागी होणे ही प्रत्येक गोमंतकीयाची सांस्कृतिक जबाबदारी आहे. गोवा ‘पूर्वेचे रोम’ नव्हे; तो प्राचीन काळापासून तीर्थ, विद्या, व्यापार आणि संस्कृतीचा दीपस्तंभ असलेली—पश्चिम किनारपट्टीवरील भारताची काशी आहे.

Trending

Exit mobile version