उत्तम पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली भूतवाडी-विर्नोडा येथे उपक्रम; महिलांसाठी घरबसल्या रोजगाराची संधी
गोवा खबर : महिलांना स्वावलंबी बनविण्यासह त्यांच्यासाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने पेडणे सेवा ट्रस्टतर्फे उत्तम पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली भूतवाडी, विर्नोडा-पेडणे येथील महिलांना पेपर प्लेट बनविण्याचे मशीन आणि त्यासंबंधित उत्पादन उपकरणे प्रदान करण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक महिलांना पेपर प्लेट तसेच इतर कागदी उत्पादनांची निर्मिती करता येणार आहे. विशेष म्हणजे महिलांना घरातूनच हे उत्पादन सुरू करण्याची संधी मिळणार असल्याने त्यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून उत्पन्नाचे साधन निर्माण करता येणार आहे.
महिलांमध्ये स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. पेपर प्लेट आणि अन्य कागदी वस्तूंच्या निर्मितीच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पेडणे सेवा ट्रस्टच्या या उपक्रमामुळे भूतवाडी-विर्नोडा परिसरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.