गोवा खबर

शाळेच्या वर्गातून थेट भारत मंडपमपर्यंत ‘प्राण’चा प्रवास!

Published

on

Spread the love

उपासना-कवितेच्या कल्पनेला राष्ट्रीय स्टार्टअप व्यासपीठ

गोवा खबर : चिंबल येथील युनियन हायस्कूलच्या विद्यार्थिनी उपासना कुमारी आणि कविता राठोड यांनी विकसित केलेल्या ‘प्राण’ (PRAN – Patient Relief Aid Network) या समाजोपयोगी मोबाईल ॲपने शाळेच्या वर्गातून थेट नवी दिल्लीतील भारत मंडपमपर्यंत झेप घेतली आहे. या अभिनव प्रकल्पाचे सादरीकरण भारत मंडपम येथे आयोजित IdeaBaaz Startup Fest मध्ये करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांनी कोडिंगच्या माध्यमातून विकसित केलेल्या ‘प्राण’ प्रकल्पाला मे महिन्यात जकार्ता येथे आयोजित Codeavour या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळाले. त्यानंतर संगम सेवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित गोंयचो उद्योगपती या स्टार्टअप स्पर्धेत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेतील निवडीनंतर ‘प्राण’ला राष्ट्रीय स्तरावरील IdeaBaaz Startup Fest मध्ये सादरीकरणाची संधी मिळाली.

रुग्णांना आवश्यक आरोग्यसेवा मिळविताना येणाऱ्या आर्थिक अडचणी, माहितीचा अभाव, भाषेच्या अडचणी आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव दूर करण्याच्या उद्देशाने ‘प्राण’ ॲपची संकल्पना विकसित करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या तांत्रिक विकासात दिलखुश कुमार या विद्यार्थ्यानेही कोडिंगमध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य केले. विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी शाळेतील शिक्षक दिलीप वझे, व्यंकटेश प्रभू, आशिष ठाकुरदेसाई आणि ध्रुव कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले.

‘प्राण’ ॲप प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढील काळात प्रयत्न सुरू असून, त्यासाठी आर्थिक सहकार्य देण्याचे आश्वासन IdeaBaazचे संस्थापक सगुण वाघ आणि संगम सेवा फाउंडेशनचे अधिकारी नितीन नाईक यांनी दिले आहे.

या प्रकल्पाला स्टार्टअपच्या दिशेने नेण्यासाठी रामदास एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत आमोणकर, सचिव डॉ. विशाल सावंत, व्यवस्थापक पुंडलिक सावंत तसेच युनियन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निर्मला नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शालेय स्तरावर जन्मलेली एक समाजोपयोगी कल्पना आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून भारत मंडपमपर्यंत पोहोचणे ही युनियन हायस्कूलसाठी तसेच गोव्यातील विद्यार्थी नवकल्पनांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ‘प्राण’चा हा प्रवास विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते समाजासाठी उपयुक्त अशा स्टार्टअपमध्ये रूपांतरित होऊ शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

Trending

Exit mobile version