गोवा खबर

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याहस्ते मनवेध’ आणि ‘अविरत’ पुस्तकांचे प्रकाशन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:आजच्या वेगवान डिजिटल युगात मोबाईल आणि सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे नव्या पिढीमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली असून, ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापक ‘वाचन चळवळ’ उभारण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केरळ व तामिळनाडूचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांनी केले. प्रत्येक घरात बालपणापासूनच, विशेषत, किशोरवयात वाचनाची आवड निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पालक आणि शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे. त्यासाठी गावागावांत ज्ञान, विचार आणि संस्कारांची केंद्रे ठरतील अशी ‘वाचन मंदिरे’ उभारली गेली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

श्री श्याम गावकर लिखित ‘मनवेध’ आणि ‘अविरत’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी व्यासपीठावर माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर हेदे, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, पत्रकार संगम भोंसुले, लेखक श्याम गांवकर उपस्थित होते.

पुस्तक हे केवळ ज्ञान मिळविण्याचे अथवा मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तीच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे आणि समाजाच्या जडणघडणीला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आर्लेकर यांनी पुढे केले. दर्जेदार व आशयसमृद्ध साहित्याच्या सातत्यपूर्ण वाचनामुळे विचारांना प्रगल्भता प्राप्त होते, व्यक्तिमत्त्वावर संस्कार घडतात आणि संवेदनशील तसेच सुसंस्कृत पिढीच्या निर्मितीस चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

वाचन ही केवळ वैयक्तिक आवड न राहता सामाजिक चळवळ बनली पाहिजे. प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक घरात पुस्तकांशी मैत्री निर्माण झाली, तरच वैचारिकदृष्ट्या सक्षम आणि संस्कारक्षम समाजाची उभारणी शक्य होईल, असा विश्वासही राज्यपाल श्री. आर्लेकर यांनी व्यक्त केला.

आजच्या डिजिटल आणि सोशल मीडिया-केंद्रित युगात वाचनसंस्कृती टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. विशेषत रील्स, लघु व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे बालक व युवकांचा पुस्तकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून वाचनाची सवय कमी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत लेखक श्याम गावकर यांच्यासारखे साहित्यिक सातत्याने सकस लेखन करत असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करावे लागेल, असे मत माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर हेदे यांनी व्यक्त केले. पूर्वी शाळांमध्ये असणाऱ्या ‘लायब्ररी पिरियड’मुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ वाचनाचीच नव्हे, तर चिंतन करण्याची, स्वतःची मते तयार करण्याची आणि ती प्रभावीपणे मांडण्याची सवय विकसित होत होती, असे ते पुढे म्हणाले.

‘मनवेध’ आणि ‘अविरत’ या दोन्ही पुस्तकावर भाष्य करताना दोन्ही पुस्तकातील प्रमुख लेखावर भाष्य करताना वाचकांनी लेखकांच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचे सांगून पुस्तकातील लेख युवामन, नातेसंबंध, संवाद, वाचन आणि चिंतन अशा विविध विषयांना स्पर्श करणारे आहेत. सदर लेख वाचकांना अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करतात असे सांगून ते पुढे म्हणाले आजच्या तरुण पिढीने आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात आणि कुटुंबीयांशी संवादाचे नाते अधिक दृढ करावे, असे मतही श्री. संगम भोंसुले यांनी व्यक्त केले.

यावेळी लेखक श्याम गांवकर म्हणाले की, आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात घराघरांतील संवाद कमी होत असून वाचनसंस्कृतीही हळूहळू मागे पडत आहे. बदलत्या सामाजिक जीवनातील या वास्तवाचे प्रतिबिंब आपल्या लेखनातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या दोन्ही पुस्तकांमध्ये कोणताही उपदेश करण्याचा हेतू नसून समाजात घडणाऱ्या विविध घटना, बदलते मानवी संबंध आणि जीवनातील अनुभव यांचा संवेदनशीलतेने वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लेखनप्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या तसेच या पुस्तकनिर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

यावेळी, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांचेही भाषण झाले.

सौ. मंजरी मयुरेश वाटवे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री ओंकार गोवेकर यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version