गोवा खबर: पर्वरी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या तपासाच्या हाताळणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपासात तडजोड झाली आहे का? याचे उत्तर मुख्यमंत्री आणि डीजीपींनी द्यावे, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली.
“डीजीपी सांगतात की तपासावर परिणाम होऊ नये म्हणून तपासाशी संबंधित माहिती उघड करता येणार नाही. मग सीसीटीव्ही फुटेज आणि तपासाशी संबंधित संवेदनशील माहिती माध्यमांपर्यंत पोहोचते कशी? ही माहिती कोणाकडे उपलब्ध होती? ती बाहेर लीक करण्यास परवानगी कोणी दिली?” असा थेट सवाल पणजीकर यांनी केला.
पर्वरी पोलीस ठाणे घटनास्थळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असतानाही गोळीबाराचे घटनास्थळ तातडीने सुरक्षित करून सील का करण्यात आले नाही? याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
“गंभीर फौजदारी तपासामध्ये घटनास्थळाचे संरक्षण, पुराव्यांची सुरक्षितता आणि प्रत्येक पुराव्याची काटेकोर ‘चेन ऑफ कस्टडी’ अत्यावश्यक असते. अशा परिस्थितीत तपासाशी संबंधित संवेदनशील माहिती पोलिस यंत्रणेतील सूत्रांकडून बाहेर येत असेल, तर हा गोपनीयतेचा भंग नेमका कोणी केला? त्याची जबाबदारी कोणाची?” असा सवाल पणजीकर यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री वारंवार ‘कठोर कारवाई करू, कोणालाही सोडणार नाही’ अशी आश्वासने देत आहेत. मात्र, आता केवळ आश्वासनांनी जनतेचे समाधान होणार नाही, असे पणजीकर यांनी स्पष्ट केले.
“गोमंतकीय जनतेला आता आश्वासन नव्हे, उत्तरदायित्व आणि सत्य हवे आहे. तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि सुरक्षित आहे, हे सरकारने स्पष्ट करावे. तपासातील गोपनीय माहिती लीक झाली असेल, तर संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री आणि डीजीपींनी जनतेसमोर स्पष्ट उत्तर द्यावे—तपास सुरक्षित आहे की तपासाशीच तडजोड झाली आहे?” असे अमरनाथ पणजीकर यांनी ठणकावून सांगितले.