गोवा खबर

मराठी राजभाषा ठरावासाठी पुढाकार घ्या; मंत्री सुदिन ढवळीकरांना समितीचे निवेदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : आगामी विधानसभा अधिवेशनात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासंबंधी ठराव आणि आवश्यक कायदा दुरुस्ती आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या फोंडा प्रखंड समितीने मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे केली आहे. सुमारे ५० मराठीप्रेमींच्या गटाने ढवळीकर यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन त्यांना सादर केले.

येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्यातील सर्व आमदारांची भेट घेऊन मराठी राजभाषा ठराव या शेवटच्या अधिवेशनात आणण्याची मागणी करणारे निर्वाणीचे निवेदन देण्याचा निर्णय मराठी राजभाषा निर्धार समितीने घेतला आहे. या निर्णयानुसार फोंडा प्रखंड समितीच्या वतीने मंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेण्यात आली.

निवेदन देताना फोंडा प्रखंड समितीचे प्रमुख जयंत मिरिंगकर, प्रखंड समन्वयक शाणुदास सावंत तळावलीकर, डॉ. दत्ताराम देसाई, प्रदीप बखले, सुप्रिया केतकर, उमेश दाणी, गुरुदास प्रभु, अंजली चितळे, नारायण नाईक आणि विनोद पोकळे आदी उपस्थित होते.

तसेच फोंडा प्रखंडातील केंद्रीय कार्यकारी मंडळ व केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य जयवंत आडपैकर, दिवाकर शिंक्रे, गोविंद देव, युवाशक्ती मार्गदर्शक मच्छिंद्र च्यारी, राज्य मातृशक्ती प्रमुख डॉ. अनीता तिळवे आणि मराठी राजभाषा निर्धार समितीचे प्रमुख मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासाठी स्थापनेपासूनच मराठी हा आधारभूत विषय राहिला आहे. मगो पक्ष सत्ताधारी राज्य सरकारमध्ये भागीदार असल्याने मराठी राजभाषेसंबंधी ठराव आणि कायदा दुरुस्ती आणण्यासाठी पक्षाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी मराठीप्रेमींनी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे केली.

मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून ही माहिती दिली आहे.

Trending

Exit mobile version