गोवा खबर

मराठी राजभाषेसाठी 31 ऑगस्टला विधानसभेवर 5 हजार मराठीप्रेमींचा मोर्चा

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, सोमवार 31 ऑगस्ट रोजी विधानसभेवर 5 हजार मराठीप्रेमींचा मोर्चा काढण्यात येणार आहे. यासह आमदारांच्या भेटी, मराठी सद्भावना मिलन कार्यक्रम आणि स्वाक्षरी मोहीम अशा विविध उपक्रमांची घोषणा समितीने केली आहे.

मराठी राजभाषा निर्धार समितीच्या 24 ऑगस्ट 2026 रोजी हॉटेल मनोरशांती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी आंदोलनाची माहिती देण्यात आली.

आतापर्यंत अडीच लाख घरांत स्वाक्षरी मोहीम

समितीने राज्यभर सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अडीच लाख घरांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले. 31 ऑगस्ट ही या मोहिमेची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली असून, सुमारे 3 लाखांपर्यंत सह्या गोळा होतील, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

स्वाक्षरी मोहिमेचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना या विषयाबाबत अवगत करण्याचा समितीचा मानस आहे.

33 आमदारांच्या भेटी

31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील मतदारांकडून आमदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात झाली आहे. या भेटीदरम्यान आगामी अधिवेशनात मराठीच्या राजभाषेसंदर्भातील ठराव यावा, यासाठी आमदारांना निवेदने देण्यात येत आहेत.

आतापर्यंत 33 आमदारांच्या भेटी झाल्याचे समितीने सांगितले. तसेच 2027 च्या निवडणुकीत निकालांची पुनरावृत्ती करायला भाग पाडू नका, असा सूचक इशाराही देण्यात आला आहे.

सहा प्रखंडांत मराठी सद्भावना मिलन

आंदोलनाचा पाठिंबा अधिक व्यापक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रखंडांतील निवडक मान्यवर आणि प्रतिष्ठितांचे एकत्रीकरण करून त्यांच्या सह्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

आतापर्यंत मुरगाव, फोंडा, मांद्रे, म्हापसा, सत्तरी आणि तिसवाडी अशा सहा प्रखंडांत मराठी सद्भावना मिलन कार्यक्रम झाल्याची माहिती देण्यात आली. सप्टेंबरच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात आणखी 10 मराठी सद्भावना मिलन कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कदंब बसस्थानकापासून मोर्चाला सुरुवात

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवार 31 ऑगस्ट रोजी विधानसभेवर 5 हजार मराठीप्रेमींचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या दिवशी सकाळी 9.30 वाजता कदंब बसस्थानकासमोरील नव्या पुलाच्या सर्कलपाशी मराठीप्रेमींनी जमावे, असे आवाहन समितीने केले आहे.

या अधिवेशनात मराठीचा ठराव सत्ताधारी पक्षाने न मांडल्यास मराठी राजभाषा निर्धार समिती पूर्णपणे विरोधात जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मराठी राजभाषेसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असल्याचेही समितीने स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला सुभाष वेलिंगकर, गो. रा. ढवळीकर, दिवाकर शिरोडकर, अशोक नाईक, गोविंद देव, डॉ. अनिता तिळवे, संदीप पाळणी, नितीन फळदेसाई, विनायक त्यागी आणि अॅड. रोशन सामंत उपस्थित होते.

Trending

Exit mobile version