१,५०० आसनक्षमतेच्या चार नवीन व्याख्यान सभागृहांचे उद्घाटन
गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते वैद्यकीय शिक्षण आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांना पुढे नेण्याच्या दृष्टीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका नवीन शैक्षणिक सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. ही नवीन सुविधा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण भर असून यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या अध्ययन जागा निर्माण झाल्या आहेत आणि संस्थेच्या वाढत्या शैक्षणिक गरजांनाही आधार मिळत आहे असे ते म्हणाले.
वैद्यकीय शिक्षणासाठी विस्तारित जागा निर्माण करणारा हा प्रकल्प अंदाजे ४० कोटी रुपये खर्चाने विकसित करण्यात आला असून त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र ५,४८२ चौरस मीटर आहे. या सुविधेत चार व्याख्यान कक्ष आहेत त्यापैकी तीनमध्ये प्रत्येकी ३०० विद्यार्थ्यांची आणि एकामध्ये ६०० विद्यार्थ्यांची क्षमता असून त्यात १,५०० विद्यार्थ्यांसाठी बसण्याची सोय आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ५० अतिरिक्त एमबीबीएस जागांना मंजुरी दिल्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची वार्षिक एमबीबीएस प्रवेश क्षमता २०० वरून २५० जागांपर्यंत वाढणार आहे
.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण १९९१ पासून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित असल्याचे सांगितले. या संस्थेने केवळ गोव्यातीलच नव्हे, तर शेजारील कारवार आणि सिंधुदुर्गातील लोकांचाही विश्वास संपादन केला आहे.” या विश्वासाचे महत्त्व प्रतिपादताना त्यांनी “लोकांनी जीएमसीवर ठेवलेला विश्वास ही सरकारसाठी अभिमानाची बाब आहे असे सांगितले. आपण या विश्वासाला साजेसे काम केले पाहिजे.” त्यांनी पुढे यावर जोर दिला की, आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि आरोग्य सुविधांबाबत कोणतीही तडजोड करू नये. आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेच पाहिजे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
आरोग्यसेवेला अधिक सुलभता आणि कार्यक्षमतेकडे नेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जीएमसीमध्ये आधीपासूनच उपलब्ध असलेल्या ऑनलाइन वैद्यकीय अपॉइंटमेंट प्रणालीच्या धर्तीवर ऑनलाइन ओपीडी सुविधा सुरू करण्याचे आवाहन केले. यामुळे रुग्णांच्या अनावश्यक भेटी कमी होऊ शकतील आणि रुग्णालयावरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल असे ते म्हणाले. जीएमसीवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आणि लोकांच्या जवळ उपचार सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा आणि उप-जिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
वैद्यकीय शिक्षणाच्या केंद्रस्थानी रुग्णसेवा ठेवून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विद्यार्थ्यांना समर्पणाने शिकण्याचे, आत्मविश्वासाने प्रयोग करण्याचे आणि चांगली सेवा करण्याचे आवाहन केले. त्यांनी डॉक्टरांची ओळख केवळ ज्ञान आणि कौशल्यानेच नव्हे, तर त्यांच्यातील सहानुभूती, सचोटी आणि समाजाप्रती असलेल्या वचनबद्धतेनेही होते यावर भर दिला. तसेच, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चांगला उपचार आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळायला हवी, यावरही त्यांनी जोर दिला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जीएसआयडीसी, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य विभाग, सल्लागार, कंत्राटदार, अभियंते, वास्तुविशारद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री, श्री विश्वजित राणे, कळंगुटचे आमदार आणि जीएसआयडीसीचे अध्यक्ष, श्री मायकल लोबो, मुख्य सचिव, डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, आरोग्य सचिव, श्री यतींद्र एम. मराळकर, आयएएस, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्रा. डॉ. जयप्रकाश तिवारी, जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, श्री रोहित कदम, आरोग्य व वित्त विभागाचे सहसचिव, श्री प्रणव भट, वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.