गोवा खबर

सैनिकांसाठी ‘एक राखी’ उपक्रम; 27 ऑगस्टला लोकभवनात विशेष कार्यक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी चैतन्य प्रतिष्ठान, गोवा यांच्यातर्फे यंदाही ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम गुरुवार, 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता दोना पावला येथील लोकभवनाच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे.

या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण हे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील. तसेच केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र व्ही. आर्लेकर यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे.

गोव्यातून जवानांसाठी राख्या

चैतन्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि देशाच्या सीमेवर सेवा बजावणारे जवान यांच्यात भावनिक नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

गोव्यातील शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडूनही जवानांसाठी राख्या संकलित केल्या जातात. यंदा सर्वसामान्य नागरिकांनाही जवानांसाठी राख्या देण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.

या उपक्रमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा उद्देश असल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे.

सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात चैतन्य प्रतिष्ठानचे कार्य

चैतन्य प्रतिष्ठान ही नोंदणीकृत सेवाभावी संस्था असून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत करण्याबरोबरच संस्कृती, शिक्षण, वारसा आणि सामाजिक मूल्यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे संस्थेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Trending

Exit mobile version