पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजप कोअर कमिटी आणि मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या कल्याण आणि विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी उपक्रमांच्या कार्यप्रणालीचा आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे, सरकारी सेवा आणि योजनांची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवणे तसेच लोककल्याणकारी योजनांचा लाभ गोव्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे, या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सरकारच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासोबतच नागरिकांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिसादक्षम सरकार, उत्तरदायी प्रशासन आणि ‘विकसित भारत 2047’मध्ये योगदान देणारा ‘विकसित गोवा’ घडविण्यासाठी सरकारची बांधिलकी कायम असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.