गोवा खबर : सांगेचे आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, संघर्षातून पुढे आलेल्या आणि समाजाप्रती प्रेम व आपुलकी असलेल्या फळदेसाईंसारख्या नेतृत्वाची गोव्याला गरज असल्याचे प्रतिपादन केले. फळदेसाई यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार, माजी लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सुभाष फळदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त सांगे नगरपालिका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर फळदेसाई यांनी शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर सांगे भाजपा मंडळ आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरातही त्यांनी सहभाग घेतला.
संघर्ष करणारे पहिले आमदार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फळदेसाई यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांचे विशेष कौतुक केले. पेयजल प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि पाणी प्रश्नासाठी संघर्ष करणारे ते पहिले आमदार ठरतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
फळदेसाई यांच्यासारख्या नेतृत्वाची आज गोव्याला गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. समाजाविषयी असलेले प्रेम, आपुलकी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची त्यांची वृत्ती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री, खासदार आणि आमदारांची उपस्थिती
वाढदिवसानिमित्त आयोजित केक कापण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार दिगंबर कामत, सभापती गणेश गावकर, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार नीलेश काब्राल, उपसभापती जोशुआ डिसोझा, माजी आमदार प्रवीण झांट्ये, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री माविन गुदिन्हो, माजी मंत्री प्रकाश वेळीप, अॅड. कृष्णा गावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, आमदार संकल्प आमोणकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, आमदार दाजी साळकर, माजी आमदार हिलारियो लोबो, आमदार राजेश फळदेसाई आणि आमदार चंद्रकांत शेट्ये यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
जनतेकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
कार्यक्रमाला राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबतच फळदेसाई यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
सुभाष फळदेसाई यांनीही उपस्थितांचे आभार मानले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमामुळे सांगे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.