गोवा खबर: माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी भाजपमधून राजीनामा देण्याचा निर्णय बराच विचार करून घेतल्याचे स्पष्ट केले आहे. हा निर्णय कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून आपल्या तत्त्वांवर आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या आधारावर घेतल्याचे त्यांनी सांगितले.
साळगावकर म्हणाले की, आपल्या राजकीय विचारांमध्ये आणि आपण ज्या दिशेने पुढे जात होतो त्यामध्ये हळूहळू अंतर वाढत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत गांभीर्याने विचार करून भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
अलीकडे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानेही आपल्याला गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडले, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रश्नांकडे आणि भावनाांकडे दुर्लक्ष करता कामा नये, अशी भूमिका साळगावकर यांनी मांडली.
आपला राजीनामा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. हा निर्णय पूर्णपणे आपली तत्त्वे, राजकीय विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी लक्षात घेऊन घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी साळगावच्या जनतेप्रती असलेली आपली बांधिलकी कायम राहील, असेही जयेश साळगावकर यांनी सांगितले.