गोवा खबर : काँग्रेससोबतच्या युतीबाबत सुरू असलेली चर्चा सध्या स्थगित असून, याबाबत भविष्यात कोणताही बदल करायचा झाल्यास त्याचा निर्णय गोवा फॉरवर्ड पक्षच घेईल, असे पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसकडून युतीसाठी करण्यात आलेल्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना सरदेसाई यांनी सध्याच्या परिस्थितीत युतीबाबत सकारात्मक भूमिका घेण्यास नकार दिला. काँग्रेससोबत युती करण्याच्या विरोधात जनभावना असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवरही सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केले. भविष्यात काँग्रेसकडून पुन्हा पक्षांतराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोप करत त्यांनी युतीबाबत सावध भूमिका घेतली.
दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्ष आता जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन अभियान सुरू करणार असल्याची घोषणाही सरदेसाई यांनी केली. ‘जय गांव ताय हांव’ हे अभियान उद्यापासून कुशावती जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून पक्ष स्थानिक पातळीवर नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, आगामी काळातील गोवा फॉरवर्डच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने या मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे.