ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणाभिमुख सेवा, निवृत्ती वेतन सुलभता, आरोग्य तपासणी आणि सायबर सुरक्षा जनजागृतीचे आयोजन
गोवा खबर:राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन दूरसंचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा, नागपूर यांच्या प्रादेशिक कार्यालयात पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना कल्याणाभिमुख सेवा, जनजागृती आणि निवृत्ती वेतनधारकांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
डॉ. सतीश चंद्र झा, दूरसंचार लेखा नियंत्रक, महाराष्ट्र आणि गोवा हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नागपूर विभागातील सुमारे 70–80 निवृत्ती वेतनधारक या कार्यक्रमात सहभागी झाले. सीसीए कार्यालयाने केलेल्या व्यवस्था आणि उपक्रमांबाबत त्यांनी आनंद व्यक्त करून त्याबद्दल कौतुक केले. डॉ. सतीश चंद्र झा यांनी ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या समर्पित सेवेची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, निवृत्ती वेतनधारकांना सुलभ, अखंडित आणि त्रासमुक्त सेवा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या कल्याणासाठी सीसीए कार्यालयाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनासंबंधित सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी)/नो युअर पेन्शनर (केवायपी) आणि निवृत्ती वेतनधारक ओळखपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले.
निवृत्ती वेतनधारकांसाठी आरोग्य तपासणी शिबीरही घेण्यात आले. या शिबिरात श्री भवानी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.
आर्थिक साक्षरता आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती सत्र श्रद्धा धोमणे, सायबर तांत्रिक सदस्य, पोलीस विभाग; शिवकुमार, एडी, दूरसंचार विभाग आणि रवी निकाळजे, पीआरआय (पी), टपाल विभाग यांनी घेतले. या सत्रात सुरक्षित डिजिटल व्यवहार, सायबर फसवणूक आणि डिजिटल आर्थिक सेवा वापरताना घ्यावयाची खबरदारी याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमात वृक्षारोपणही करण्यात आले. त्यामध्ये निवृत्ती वेतनधारकांसह इतर मान्यवर सहभागी झाले. यामागे पर्यावरणीय जबाबदारीचा संदेश देण्याबरोबरच, समाजाभिमुख उपक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग ठळक करण्याचे उद्दीष्ट होते. ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित कार्यक्रमातील सेवा आणि व्यवस्थांचे कौतुक केले, त्यामुळे प्रादेशिक कार्यालय, नागपूर इथे प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचा सोहळा अर्थपूर्ण आणि यशस्वी उपक्रम ठरला.