गोवा खबर:भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने दक्षिण गोव्यातील बाणावली येथील फेअरफील्ड बाय मॅरियॉट येथे खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना आणि ई-साक्षी पोर्टलवर राज्य नोडल प्राधिकरण, जिल्हा प्राधिकरण आणि अंमलबजावणी संस्थांसाठी क्षमता-बांधणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडू तसेच लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रतिनिधींनी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या विविध पैलूंवर चर्चा केली, ज्यामध्ये शिफारशींवर प्रक्रिया करणे, पात्र कामांना मंजुरी देणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, खरेदी प्रक्रिया, आर्थिक व्यवस्थापन, देखरेख आणि ई-साक्षी पोर्टलचा प्रभावी वापर यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाने सहभागी प्राधिकरणे आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमध्ये संवाद सुलभ केला, ज्यामुळे खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या अंमलबजावणी आणि ई-साक्षी पोर्टलच्या वापराशी संबंधित मुद्द्यांवर अनुभवांची देवाणघेवाण करण्याची, व्यावहारिक आव्हानांवर चर्चा करण्याची आणि स्पष्टीकरण मागण्याची संधी मिळाली. या सत्रांमुळे संबंधित घटकांमध्ये समन्वय आणि सर्वोत्तम पद्धतींच्या देवाण घेवाणीलाही प्रोत्साहन मिळाले.
या उपक्रमामुळे संबंधित प्राधिकरणांची संस्थात्मक क्षमता वाढेल, समन्वय सुधारेल आणि खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या कामांची अधिक प्रभावी, पारदर्शक व वेळेवर अंमलबजावणी सुलभ होईल, ज्यामुळे जनतेला विकासाचे लाभ कार्यक्षमतेने मिळण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.
या कार्यक्रमाला सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या महासंचालक श्रीमती गीता सिंह राठोड, खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेचे उपमहासंचालक श्री. जोसेफ सी. एफ, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे संचालक श्री. विकास निगम, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्रीमती एग्ना क्लींटस, आयएएस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.