गोवा खबर

डेम्पो महाविद्यालयात नशा मुक्त युवा मल्टीमीडिया प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर:केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय संचार  ब्युरो अर्थात सीबीसी, गोवा यांच्या वतीने, सेंट क्रूझ (कुजिरा) येथील डीसीटीच्या श्रीनिवास सिनाई डेम्पो महाविद्यालयात विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा – संकल्प अभियान या विषयावरील दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एनएसएस  विभागाच्या सहकार्याने 20 ते 21 ऑगस्ट दरम्यान आयोजित या प्रदर्शनाचा उद्देश तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैली निवडण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. तसेच, विकसित भारतच्या संकल्पनेनुसार एक निरोगी, उत्पादक आणि अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्यात तरुणांना सक्रिय भागीदार बनवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

उद्घाटन समारंभात बोलताना मंत्र्यांनी भारताला अंमली पदार्थमुक्त राष्ट्र बनवण्याच्या केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ निर्धाराचा उल्लेख केला . त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयाचाही उल्लेख केला आणि हे स्वप्न साकार करण्यात तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे, हे अधोरेखित केले.

डीसीटीच्या श्रीनिवास सिनाई डेम्पो महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. मनोज कामत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच, त्यांनी या मोहिमेची उद्दिष्टे आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचे परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व विशद केले.

उद्घाटन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल सीबीसी तर्फे महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आणि एनएसएस समन्वयक प्रा. डॉ. मनोज कामत, डॉ. आरती आर. पोपकर आणि  स्टेसा एल्सी परेरा यांचा सत्कार करण्यात आला.

या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोस्टर निर्मिती, रांगोळी आणि निबंध लेखन स्पर्धांमधील विजेत्यांनाही मंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला पत्र सूचना कार्यालय, गोवाचे संचालक नाना मेश्राम, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो अर्थात एनसीबी, गोवाचे सहाय्यक संचालक विशाल पवार आणि सीबीसी, गोवाचे प्रसिद्धी अधिकारी  रियास बाबू उपस्थित होते. या मल्टिमिडीया प्रदर्शनात अंमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम अधोरेखित करणारी माहिती व जनजागृतीपर घटक समाविष्ट आहेत; तसेच हे प्रदर्शन तरुणांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्यास आणि अंमली पदार्थ व इतर हानिकारक गोष्टींपासून दूर राहण्यास प्रोत्साहित करते.

उद्घाटनाच्या दिवशी पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्या संकुल, कुजिरा येथील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट दिली आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रदर्शनातील विविध गोष्टींची पाहणी केली. हे प्रदर्शन 21 ऑगस्ट पर्यंत महाविद्यालयात सुरू राहणार आहे.

Trending

Exit mobile version