तरीही काँग्रेससोबत एकत्र येऊन भाजपचा पराभव करण्याची आमची इच्छा आहे” — आघाडीबाबत ‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स यांनी काँग्रेसकडून स्पष्टता मागितली
गोवा खबर:आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स यांनी सांगितले की, काँग्रेसकडून ‘आप’वर वारंवार होणाऱ्या टीकेमुळे ‘आप’चे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक दुखावले आहेत. आघाडी करण्याच्या बाजूने ‘आप’ने आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असून, भाजपचा पराभव करणे हा या आघाडीमागील प्रमुख उद्देश आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. काँग्रेसने ‘आप’सोबत आघाडी करण्याबाबत आपली भूमिका गोमंतकीय जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
एका महिन्यात काँग्रेसच्या नेत्यांकडून ‘आप’वर करण्यात आलेल्या दुसऱ्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना जर्सन गोम्स म्हणाले की, काँग्रेसकडून ‘आप’ला एका कोपऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे आमदार एल्टन डी’कोस्टा यांनी ‘आप’च्या कार्याबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका करताना गोम्स म्हणाले की, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि देशभरात काम करण्याचा अधिकार दोन्ही पक्षांना आहे.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेमुळे ‘आप’चे नेते आणि कार्यकर्ते तसेच आघाडी व्हावी अशी इच्छा असलेल्या सर्वसामान्य गोमंतकीयांच्या भावना दुखावल्या आहेत. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल यांनीही कॅमेऱ्यासमोर गोव्यात काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही काँग्रेसकडून ‘आप’वरील हल्ले थांबत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
आघाडीच्या मुद्द्यावर गोमंतकीय जनतेच्या इच्छेविरुद्ध ‘आप’ कधीही जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपविरोधात एकजूट करण्यासाठी वैयक्तिक तसेच राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवण्याची ‘आप’ची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
आघाडी करण्याची इच्छा असल्याची ‘आप’ची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना जर्सन गोम्स यांनी काँग्रेसने आघाडीबाबतची आपली भूमिका गोमंतकीय जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी केली.