गिरीश चोडणकर करणार श्री सत्यनारायण पूजेचे यजमानपद
गोवा खबर : दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सोमवार २४ ऑगस्ट रोजी श्री देव रुद्रेश्वर देवस्थान, हरवळे-सांखळी येथे विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी १० वाजता श्री देव रुद्रेश्वर स्थायी समितीचे सदस्य श्री. गिरीश राया चोडणकर, रा. फातोर्डा, मडगाव, यांच्या यजमानपदाने श्री सत्यनारायण पूजा विधिवत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, सचिव सुभाष किनळकर, अॅटर्नी संगेश कुंडईकर, संयुक्त अॅटर्नी वासुदेव गावकर, तसेच भंडारी समाजाचे नेते दत्तप्रसाद नाईक आणि अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.
दुपारी ठीक १ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ठीक ८ वाजता ढोल-मृदंगाच्या गजरात श्री देव रुद्रेश्वरांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या भक्तिमय पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रींचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्रावण महिन्यातील हा पवित्र सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. गोमंतकीय धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अखिल गोवा गोमंतक भंडारी समाज आणि श्री देव रुद्रेश्वर देवस्थान समितीतर्फे सर्व भाविकांना या मंगलमय सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून श्री देव रुद्रेश्वरांचे दर्शन, आशीर्वाद व प्रसादाचा लाभ घेण्याचे मनःपूर्वक आवाहन करण्यात आले आहे.