गोवा खबर: वास्को येथे सुरू असलेल्या पारंपरिक भजनी सप्ताहाला भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भेट देत श्री दामोदरांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसह गोमंतकीयांच्या सुख-समृद्धी आणि कल्याणासाठी श्री दामोदरांच्या चरणी प्रार्थना केली.
भजनी सप्ताहातील भक्तिमय वातावरणात दामू नाईक यांनी श्री दामोदरांचे दर्शन घेतल्यानंतर आयोजकांशी संवाद साधला. तसेच सप्ताहाच्या आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
गोव्याला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला असून, भजनी सप्ताहासारख्या उत्सवांमुळे श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेची भावना अधिक दृढ होते, असे दामू नाईक यांनी यावेळी सांगितले.
गोव्याची ही सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यात अशा धार्मिक कार्यक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी भजनी सप्ताहाच्या आयोजकांसह सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सप्ताहानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने भाविक भजन-कीर्तनात सहभागी होत श्री दामोदरांचे दर्शन घेत आहेत.