गोवा खबर

मराठीला राजभाषेचा दर्जा न दिल्यास २०२७ मध्ये परिणाम भोगावे लागतील : सुभाष वेलिंगकर

Published

on

Spread the love

गोवा खबर: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गोवा सरकारने राजभाषा कायद्यात आवश्यक बदल करून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिला.


मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मांद्रे प्रखंडातर्फे आयोजित ‘मराठी सद्भावना मिलन’ कार्यक्रमात ते बोलत होते. मांद्रे येथील रमाकांत खलप हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

मराठी राजभाषा होणे आवश्यक

यावेळी प्राचार्य वेलिंगकर यांनी गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा का मिळाला पाहिजे, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मराठीला योग्य स्थान न मिळाल्यास पुढील १५ ते २० वर्षांत गोव्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मराठीच्या राजभाषेच्या मागणीसाठी आता ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने राजभाषा कायद्यात बदल करण्याची मागणी केली. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास २०२७ च्या निवडणुकीत त्याचे राजकीय परिणाम दिसून येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या मराठी सद्भावना मिलनाला हरमलच्या जिल्हा पंचायत सदस्य राधिका पालयेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुविधा कोरगावकर, मांद्रेच्या पंच सदस्य संपदा आसगांवकर, गोवा प्रदूषण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा मोरजी येथील विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश शेटगांवकर, नाट्यलेखक तथा गायक नट पांडुरंग गावडे, नाट्य दिग्दर्शक हरी शेटगांवकर, हरमलचे माजी सरपंच रामचंद्र तथा बाबी केरकर, युवा कीर्तनकार सना साटेलकर, गायक नट साबा च्यारी, प्रभाकर गांवकर, शंकर कदम, केशव शेटगांवकर, सुजय म्हामल, तुकाराम कोरगावकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

तसेच भूमिका वेताळ देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ परब, केशव मांद्रेकर, गोपाळ परब, तरणी गावकर, अनिल आसोलकर, परेश नाईक, विठोबा बगळी, चंद्रहास दाभोलकर, दाजी आसगावकर, संजय नाईक, ज्ञानेश्वर चोपडेकर, दिलीप मेथर, शरद गावडे, विश्वास सांगाळे, सुभाष पार्सेकर, विनायक च्यारी, मंगेश कानोळकर, महेंद्र परब, संध्या आरोलकर, भोलेश नाईक, रश्मी तारी, अशोक म्हामल, लक्ष्मण गावडे आणि सूर्यकांत पेडणेकर यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गजानन मांद्रेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. मांद्रे प्रखंडाचे समन्वयक आत्माजी नाईक यांनी ऋणनिर्देश केला, तर प्रखंडाचे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या मागणीला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने मांद्रेतील हे सद्भावना मिलन महत्त्वाचे ठरले.

Trending

Exit mobile version