गोवा खबर

स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर इथे हवाई दलाच्या देखभालदुरुस्ती कमांडच्या वाद्यवृंदाचे जोषपूर्ण सादरीकरण

Published

on

Spread the love


80 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यामधून राष्ट्राला दिली सांगीतिक मानवंदना

गोवा खबर:सर्वोत्कृष्ट संगीताची प्रचीती देत आणि देशभक्तीच्या जल्लोषात भारतीय हवाई दलाच्या देखभाल दुरुस्ती मुख्यालयाच्या वाद्यवृंदाने 80 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात नागपूर येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात मनमोहक सादरीकरण केले. देशाचे सार्वभौमत्व आणि देशप्रेमाला समर्पित असलेल्या या रंगतदार कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पारंपरिक लष्करी संगीत आणि समकालिन देशभक्ती गीते अशा वैविध्यपूर्ण संगीताचा अनुभव या वाद्यवृंदाच्या सादरीकरणात नागरिकांना घेता आला. वादकांची अचूकता, समन्वय व शिस्त यातून भारतीय हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांची समर्पित वृत्ती प्रतिबिंबित झाली आणि संपूर्ण कार्यक्रमात तिने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

‘माँ तुझे सलाम’, ‘जय हो’, ‘भारत हमको’ आणि ‘लहरा दो’ या गाण्यांचे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सादर होताना सर्व प्रेक्षक अभिमानाने उभे राहिले आणि देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात या कार्यक्रमाचा समारोप झाला.

देखभाल दुरुस्ती कमांडचे कमांडिंग इन चीफ ऑफिसर, एअर मार्शल यल्ला उमेश, व्हीएसएम, पीएचडी यांच्या हस्ते विशेष अतिथी पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

लष्करी सेवेतील हुतात्म्यांचे कुटुंबिय, प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी आणि नागपूरचे रहिवासी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी सुरक्षा दले आणि समाज यांच्यातील घनिष्ठ नात्याची प्रचीती आली.

भारतीय हवाई दलाने समाजाला सहभागी करुन घेत स्वातंत्र्यदिनाचे ऐतिहासिक महत्त्व साजरे करण्यासाठी आयोजित केलेल्या देशव्यापी स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. 

Trending

Exit mobile version