गोवा खबर

“ दर्जेदार अन्न उत्पादन शेतकऱ्यांसाठी चांगल्या संधी निर्माण केल्या पाहिजेत:मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

स्वयंपूर्णा गोवा – ‘व्होकल फॉर लोकल’ने रोपे वितरण कार्यक्रमाद्वारे गोव्याच्या शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण.

गोवा खबर:गोवा सरकारच्या कृषी संचालनालयाने ‘स्वयंपूर्ण गोवा – व्होकल फॉर लोकल’ या उपक्रमांतर्गत भाजीपाला आणि फुलांच्या रोपांचे वितरण कार्यक्रम सुरू केला असून, स्थानिक शेती मजबूत करण्यासाठी एक नवीन मार्ग खुला झाला आहे. फोंडा येथील कोडारमधील ‘इंडो-इस्त्राइल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्लॉवर्स’च्या सहकार्याने चालविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना उच्च दर्जाची रोपे उपलब्ध करून देणे आणि त्यांना भाजीपाला व फुलांची लागवड करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.

पणजी येथील ईएसजीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला आणि फुलपिकांच्या रोपांचे वाटप केले. या कार्यक्रमात शेतकरी, विविध खात्यांचे अधिकारी आणि इस्रायल दूतावासाच्या ‘मशाव’चे प्रतिनिधीमंडळ एकत्र आले होते. याप्रसंगी गोव्यातील जल-बचत तंत्रज्ञानावर भारत-इस्रायल सहकार्यासाठी एक सामंजस्य करारही सादर करण्यात आला ज्यामुळे आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींमधील सहकार्य अधिक दृढ होईल.

या प्रसंगी बोलताना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतीची उत्पादकता सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळवून देण्यासाठी दर्जेदार रोपांच्या महत्त्वावर भर दिला. राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार लागवड साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक सहाय्य पोहोचविण्याच्या उद्देशाने सरकारने कोडार येथील इंडो-इस्त्राइल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये १२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले.

डॉ. सावंत यांनी  कृषी, फलोत्पादन आणि मत्स्योध्योग हे स्वयंपूर्ण गोव्याचे महत्त्वाचे घटक आहेत आणि राज्यात सेंद्रिय व गुणवत्तापूर्ण शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. गोव्यात स्थानिक उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी मोठी संधी आहे असे ते म्हणाले. फुलशेतीचा संदर्भ देताना त्यांनी गुलाबासारखी फुले पूर्वी राज्याबाहेरून आयात केली जात होती, तर आता लाखो रोपांच्या वितरणामुळे गोव्याच्या शेतकऱ्यांना स्थानिक मागणी पूर्ण करण्यास आणि भरीव उत्पन्न मिळविण्यात मदत होऊ शकते असे ते म्हणाले. स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या दर्जेदार भाज्या ग्राहकांना ओळखता याव्यात यासाठी सरकार भविष्यात ‘गोवा फ्रेश’ ही संकल्पना पुढे नेण्याची योजना आखत आहे असे ते पुढे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील नागरिकांना, विशेषतः आरडीएशी संबंधित महिलांना, कृषी आणि संबंधित उपक्रमांमधील संधी शोधण्याचे आवाहन केले. त्यांनी कृषी क्षेत्राला सहकार्य दिल्याबद्दल कृषी संचालनालय आणि असोचॅम यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांच्या सततच्या सहकार्याबद्दल व तांत्रिक मदतीबद्दल इंडो-इस्त्राइल सेंटर ऑफ एक्सलन्स आणि इस्रायलच्या माशाव यांचे आभार मानले.

स्वयंपूर्ण गोवा – व्होकल फॉर लोकल या उपक्रमांतर्गत, स्थानिक उत्पादनाला अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत संधी निर्माण करण्याच्या दिशेने या कार्यक्रमाने आणखी एक पाऊल टाकले आहे. दर्जेदार रोपे, आधुनिक शेती पद्धती आणि पाणी वाचविणाऱ्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केल्यामुळे, अधिक शेतकऱ्यांना भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक पुरवठा अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.

या प्रसंगी कृषी सचिव श्री निखिल देसाई, आयएएस, कृषी संचालनालयाचे संचालक श्री चंद्रहास देसाई, इस्रायली शेती तज्ञ श्री उरी रुबिनस्टाईन आणि श्री डॅनियल हदाद, मशाव (MASHAV) प्रतिनिधी मंडळ, शेतकरी आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version