गोवा खबर: महसूल मंत्री श्री आतानासिओ मॉन्सेरात यांनी आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासाठी नव्याने खरेदी केलेल्या ११ वाहनांना हिरवा झेंडा दाखवून सेवेत दाखल केली. या नवीन वाहनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवेत आणि कामकाजात गतिशीलता बळकट होण्यास मदत होईल.
या प्रसंगी बोलताना, महसूल मंत्री श्री आतानासिओ मॉन्सेरात यांनी सरकारी सेवा प्रभावी होण्यासाठी कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे होणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. त्यांनी नव्याने खरेदी केलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा घडवून आणण्यास आणि कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यास उपयोगी ठरेल असे सांगितले आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेवेत नवीन वाहने दाखल झाल्याने कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी महसूल सचिव श्री संदीप जॅकीस, आयएएस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्री अंकित यादव, आयएएस, उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.