गोवा खबर:ऊर्जा मंत्री श्री. रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनी पर्यावरण स्वच्छता, शिक्षणाची उत्तम उपलब्धता आणि तळागाळातील दर्जेदार पायाभूत सुविधांचा विकास यांसारखे सामूहिक प्रयत्न समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. कुशावती जिल्ह्यातील केपे येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर ते बोलत होते.
मंत्री श्री. ढवळीकर यांनी नागरिक आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाश्वत विकासासाठी अधिक मजबूत पाया तयार होऊ शकतो ज्यामुळे समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असे सांगितले. आज देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य सैनिकांच्या असंख्य त्यागांचे, संघर्षांचे आणि योगदानाचे फळ आहे. आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, पण त्याचबरोबर लोकांची देशभक्ती जबाबदार नागरिकत्व आणि समाजासाठीच्या विधायक योगदानातूनही दिसून आली पाहिजे असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यापासून देशाने एकापाठोपाठ आलेल्या प्रधान मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड विकास पाहिला आहे. आता प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने समृद्ध भारताच्या संकल्पनेच्या दिशेने उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण कामगिरीवरही प्रकाश टाकला.
नव्याने घोषित झालेल्या कुशावती जिल्ह्यात तिरंगा फडकविणारे पहिले मंत्री असल्याचा आनंद आणि अभिमान श्री. ढवळीकर यांनी व्यक्त केला.
सुरवातीस मंत्र्यांनी गोवा पोलिसांच्या तुकडीकडून मानवंदना स्वीकारली.
कुशावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. गुरुदास देसाई, पोलीस अधिक्षक श्री. आशिष शिरोडकर, उपजिल्हाधिकारी श्री. अमितेश शिरवईकर, मामलेदार श्री.नाथन आफोंसो व इतर यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्ये सादर केली.