गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रादेवी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन करून ते २५ ऑगस्ट रोजी जनतेला समर्पित केले जाईल असे सांगितले. हे स्मारक गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या बलिदानाचे स्मरण करते आणि त्यामुळे त्यांच्या शौर्याला व योगदानाला एक चिरस्थायी आदरांजली ठरेल असे ते म्हणाले.
पेडणे तालुक्यातील पत्रादेवी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी पत्रादेवी हुतात्मा स्मारकाला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून आणि विशेषतः ऐतिहासिक आणि देशभक्तीपर महत्त्वाचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे असे सांगितले. हे स्मारक पर्यटकांना, विशेषतः तरुण पिढीला, गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल आणि हुतात्म्यानी दिलेल्या बलिदानाबद्दल जाणून घेण्याची संधी देईल.
डॉ. सावंत यांनी गोव्याचा इतिहास आणि वारसा जतन करण्याबरोबरच, पर्यटनाला राज्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाशी जोडणारी अर्थपूर्ण पर्यटन स्थळे निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यामुळे, पात्रादेवी स्मारक केवळ स्मरणाचे प्रतीक म्हणूनच नव्हे, तर गोव्याचा इतिहास आणि देशभक्तीची भावना दर्शविणारे एक महत्त्वाचे स्थान म्हणूनही उभे राहील असे ते म्हणाले.
नवीनीकरण आणि ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी भारताने गेल्या ८० वर्षांत लक्षणीय प्रगती केली असून एक सामर्थ्यवान आणि विकसनशील राष्ट्र म्हणून उदयास आले आहे असे सांगितले. देशाला अधिक सामर्थ्यवान आणि समृद्ध बनविण्यासाठी एकता आणि सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी प्रतिपादले. श्री नाईक यांनी भारत ही अध्यात्म, संस्कृती आणि दैवी वारसा असलेली भूमी आहे असे सांगून त्यांनी नागरिकांना राष्ट्राच्या प्रगती व विकासासाठी एकजूट राहून एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
त्यांनी तरुण पिढीचे संगोपन करून त्यांना मार्गदर्शन करावे, जेणेकरून ते अधिक मजबूत आणि विकसित भारताच्या उभारणीत अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील असे ते म्हणाले.
गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री रोहिदास देसाई यांचेही यावेळी भाषण झाले.
यावेळी आमदार श्री प्रविण आर्लेकर, आमदार श्री जीत आरोलकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदवेलू (आयएएस), उत्तर जिल्हाधिकारी श्री अंकित यादव (आयएएस), सरपंच श्रीमती पूजा साटेलकर, जिल्हा परिषद सदस्य श्री राघोबा कांबळी आणि इतर उपस्थित होते.
बालभवनच्या विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते सादर केली. कुमारी उत्कर्षा बुस्कुटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.