गोवा खबर:भारतीय रिझर्व्ह बँक पणजी प्रादेशिक कार्यालयाने गोवा विद्यापीठाच्या ‘नॉलेज पोर्टल’ वर आर्थिक साक्षरतेविषयक ई-साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे गोवा विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर संबंधितांना आरबीआयच्या आर्थिक साक्षरता तसेच बँकिंग आणि वित्तीय विषयांवरील शैक्षणिक साहित्य सहजपणे उपलब्ध होणार आहे.
या ई-साहित्याचे उद्घाटन आरबीआय, पणजीचे प्रादेशिक संचालक श्री अनुप चंद्रन व्ही. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोवा विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा हेगडे-देसाई, आरबीआयचे वित्तीय समावेशन आणि विकास विभागाचे अधिकारी, गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
हा उपक्रम आरबीआयच्या आर्थिक साक्षरता प्रसाराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग असून, बँकिंग सेवा, वित्तीय व्यवस्थेची माहिती, ग्राहक संरक्षण आणि इतर आर्थिक विषयांबाबत विशेषतः युवा वर्ग आणि शैक्षणिक समुदायामध्ये जागरूकता वाढविणे हा त्यामागील उद्देश आहे.
आरबीआय आणि गोवा विद्यापीठ यांच्यातील हे सहकार्य डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून युवकांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांच्यामध्ये सुजाण आर्थिक निर्णयक्षमता विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.