गोवा खबर: आगामी विधानसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी स्पष्ट केले आहे. अनेक राजकीय पक्षांकडून संपर्क होत असला तरी कार्यकर्ते आणि समर्थकांची इच्छा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
थिवी मतदारसंघातील विद्यमान परिस्थितीवर बोलताना कांदोळकर यांनी स्थानिक मंत्र्यांच्या कामकाजावर टीका केली. केवळ नारळ फोडणे म्हणजे विकास नसून प्रत्यक्षात जमिनीवर विकासकामे दिसली पाहिजेत, असे ते म्हणाले. थिवीतील जनता आता जागरूक झाली असून विद्यमान मंत्र्यांना घरी पाठवण्यासाठी सज्ज असल्याचा दावाही त्यांनी केला.
अल्दोणा मतदारसंघातून आपण किंवा आपली पत्नी निवडणूक लढवणार नसल्याचे कांदोळकर यांनी स्पष्ट केले. मात्र, त्या मतदारसंघातील चांगल्या आणि समविचारी उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडून आल्यानंतर कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, या प्रश्नावर कांदोळकर म्हणाले की, मतदारसंघाचा विकास आणि जनतेची कामे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर जे सरकार सत्तेत येईल, त्या सरकारला जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी पाठिंबा देण्याची भूमिका राहील.
रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आरजीपीचे अनेक कार्यकर्ते हळूहळू आपल्यासोबत जोडले जात असल्याचा दावा कांदोळकर यांनी केला.