गोवा खबर

भाऊसाहेबांच्या आदर्शांवर मांद्रे मतदारसंघाचा विकास सुरू: आमदार जीत आरोलकर

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सरपंच, पंचसदस्य, मगो पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

भाऊसाहेब बांदोडकर यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले. शेती, शिक्षण, प्राथमिक शाळा तसेच कुळ-मुंडकारांच्या हक्कांसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्याच विचारांवर आणि आदर्शांवर मांद्रे मतदारसंघात काम सुरू असल्याचे आरोलकर यांनी सांगितले.

कुळ-मुंडकारांचे अनेक खटले मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रकरणांना गती देऊन सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ‘माझे घर’ योजना सुरू केली आहे. मांद्रे मतदारसंघात या योजनेअंतर्गत ५० हून अधिक आदेश तयार झाले असून त्यांचे लवकरच वितरण केले जाणार असल्याचे आरोलकर यांनी सांगितले.

मांद्रे मतदारसंघातील विकासकामांबाबत बोलताना विकास एका दिवसात होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक प्रकल्पासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मतदारसंघातील मार्केट प्रकल्प, रवींद्र भवन आणि इतर महत्त्वाच्या विकासकामांची प्रक्रिया सुरू आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत या कामांना प्रत्यक्ष गती मिळालेली दिसेल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील ४० मतदारसंघांमध्ये विकासाच्या बाबतीत मांद्रे मतदारसंघ नेहमीच पुढे राहील, असा विश्वासही आरोलकर यांनी व्यक्त केला.

गेल्या साडेचार वर्षांत जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले. भाजप-मगो युती सरकारमुळे मांद्रे मतदारसंघाला न्याय मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजप-मगो युती कायम राहील आणि राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.

Trending

Exit mobile version