गोवा खबर:नौदल प्रमुख (सीएनएस) ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन हे 10 ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत मॉरिशसच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत. हा दौरा म्हणजे हिंदी महासागर क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे भागीदार असलेल्या मॉरिशससोबत द्विपक्षीय सागरी सहकार्य मजबूत करण्यासाठी तसेच संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताने सुरू ठेवलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
या दौऱ्यादरम्यान नौदल प्रमुख मॉरिशस सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधतील आणि सागरी सुरक्षा, संरक्षण सहकार्य, क्षमता बांधणी व लष्करी सहयोग यांसारख्या परस्पर हिताच्या बाबींवर चर्चा करतील.
अशा संवादांचा उद्देश सागरी क्षेत्रात भारत-मॉरिशस सहकार्य अधिक दृढ करणे, परिचालन स्तरावरील संबंध वाढवणे तसेच भारत व मॉरिशस यांच्यातील भक्कम सामरिक भागीदारी अधिक मजबूत करणे हा आहे.
भारत आणि मॉरिशस यांच्यात एक घनिष्ट आणि चिरस्थायी सागरी भागीदारी आहे. भारतीय नौदल राष्ट्रीय तटरक्षक दलासोबत प्रशिक्षण देवाणघेवाण, संयुक्त विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) देखरेखीसह कार्यात्मक संवाद, बंदरांना भेटी आणि जलसर्वेक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे नियमितपणे संलग्न असते. दोन्ही देश बहुपक्षीय मंच आणि सहकारी उपक्रमांमध्ये सहभागी होत एकमेकांशी संलग्न राहतात. मॉरिशसने हिंदी महासागर नौदल परिसंवाद, मिलन, आंतरराष्ट्रीय फ्लीट आढावा, गोवा सागरी परिषद, आयओएस सागर आणि AIKEYME सराव यांसारख्या भारतीय नौदलाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये नियमितपणे सहभाग घेतला आहे, जे दोघांच्या सामायिक ‘महासागर’ (MAHASAGAR सर्व प्रदेशांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती) या दूरदृष्टीचे सुयोग्य प्रतिबिंब आहे.
नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी मॉरिशसला दिलेली भेट ही परस्पर आदर, विश्वास आणि सागरी सुरक्षा, प्रादेशिक सहकार्य व हिंदी महासागर क्षेत्रातील स्थैर्यासाठीच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारित असलेल्या मॉरिशससोबतच्या मैत्रीला भारत देत असलेले प्राधान्य अधोरेखित करते.