गोवा खबर

व्यसनमुक्त तरुणाईसाठी सावर्डेत नवा प्रयोग; संकेत आर्सेकरांचा ‘ड्राय’ संस्कृतीवर भर

Published

on

Spread the love

व्यसनाधीन युवकांना सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांकडे वळवण्याचा प्रयत्न; राजकीय कार्यक्रमांतही मद्याला स्पष्ट नकार

गोवा खबर : सावर्डे मतदारसंघातील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवून त्यांना सामाजिक आणि विधायक उपक्रमांशी जोडण्यासाठी भाजपचे युवा नेते संकेत आर्सेकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. केवळ व्यसन सोडण्याचे आवाहन करण्याऐवजी तरुणांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्यावर त्यांनी भर दिला असून, सामाजिक कार्यापासून क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत विविध उपक्रमांमध्ये युवकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर स्वतःशी संबंधित राजकीय व सामाजिक कार्यक्रमांमध्ये मद्याला स्थान नसावे, अशी भूमिका घेत त्यांनी ‘ड्राय’ कार्यक्रमांची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

व्यसनाचा परिणाम केवळ संबंधित व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. त्याचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक परिणाम संपूर्ण कुटुंबाला सहन करावे लागतात. विशेषतः तरुण व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्यांच्या भविष्याबरोबरच कुटुंबीयांसमोरही अनेक समस्या निर्माण होतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन आर्सेकर यांनी सावर्डेतील युवकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रत्यक्ष उपक्रमांवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

उपदेशाऐवजी विधायक उपक्रमांशी जोडण्यावर भर

तरुणांना केवळ व्यसन सोडण्याचा सल्ला देऊन अपेक्षित बदल घडणार नाही, तर त्यांना पर्यायी आणि सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची भूमिका आर्सेकर यांनी घेतली आहे. युवकांच्या हाताला विधायक काम आणि त्यांच्या क्षमतेला योग्य दिशा मिळाल्यास व्यसनापासून दूर राहण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते, या विचारातून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

युवकांना राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडण्याबरोबरच गोरक्षा, समाजसेवा, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यावर भर दिला जात आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांना आपली ऊर्जा सकारात्मक कामांसाठी वापरण्याची संधी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रयत्नांची सावर्डे मतदारसंघातही चर्चा सुरू झाली असून, विशेषतः व्यसनाच्या समस्येमुळे चिंतेत असलेल्या कुटुंबांकडून या उपक्रमांकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.

राजकीय-सामाजिक कार्यक्रमांत मद्य नको

आर्सेकर यांनी व्यसनमुक्तीची भूमिका केवळ युवकांना सल्ला देण्यापुरती मर्यादित न ठेवता स्वतःच्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे.

“ज्या कार्यक्रमात मद्य असेल, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही,” अशी भूमिका त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडली आहे. सभा, बैठका, वाढदिवस, कार्यकर्त्यांचे मेळावे किंवा सहली अशा कार्यक्रमांमध्ये मद्याचा वापर होऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या सहभागातील कार्यक्रम ‘ड्राय’ ठेवण्याकडे कार्यकर्त्यांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.

राजकीय कार्यक्रमांमध्ये मद्याचा वापर किंवा मतांसाठी मद्यवाटप करण्याच्या प्रथेशी तडजोड न करण्याची भूमिका आर्सेकर यांनी घेतली आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीचा संदेश देतानाच त्याची सुरुवात स्वतःच्या राजकीय कार्यपद्धतीतून करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

‘मतांपेक्षा युवकांचे भविष्य महत्त्वाचे’

राजकीय फायदा किंवा मतांसाठी व्यसनाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचा निर्धारही आर्सेकर यांनी व्यक्त केला आहे. राजकीय यशापेक्षा तरुण पिढी व्यसनापासून दूर राहणे अधिक महत्त्वाचे असल्याची त्यांची भूमिका आहे.

व्यसनात अडकलेल्या युवकांना पुन्हा सामाजिक प्रवाहात आणणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देणारे वातावरण तयार करणे, हा या प्रयत्नामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

सावर्डे मतदारसंघात सुरू झालेला हा उपक्रम पुढे किती व्यापक स्वरूप घेतो आणि त्यातून प्रत्यक्षात किती युवक व्यसनापासून दूर होतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र राजकीय कार्यक्रमांपासूनच मद्याला दूर ठेवण्याची भूमिका आणि युवकांना विधायक उपक्रमांशी जोडण्याचा प्रयत्न यामुळे ‘व्यसनमुक्त सावर्डे’ची संकल्पना सध्या चर्चेत आली आहे.

Trending

Exit mobile version